चांगलं पॅकेज असेल तर अनेकदा लोक वर्क प्रोफाइल काय आहे हे सुद्धा पाहत नाहीत असं म्हटलं जातं. याच उक्तीला अनुसरुन तुम्हाला असं सांगितलं की शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरी म्हणून वर्षाकाठी ६३ लाख रुपये दिले जातील तर तुम्ही काय कराल? अर्थात कॉर्परेट जॉबला वैतागलेले अनेकजण यासाठी एका पायावर तयार होती. पण भारतातील वाचकांसाठी एक चांगली आणि वाईट बातमी आहे. चांगली अशी की खरोखरच एका कंपनीने अशी ऑफर दिलीय ज्यात शेतात काम करण्यासाठी ६३ लाखांचं वार्षिक पॅकेज देण्यात आलं आहे. वाईट बातमी अशी की ही ऑफर यूनायटेड किंग्डममध्ये आहे.

काय आहे ही जॉब ऑफर?
युके मधील एका कंपनीने वर्षभर कोबीच्या शेतात काम करण्यासाठी भल्या मोठ्या पगाराची ऑफर दिलीय. विशेष म्हणजे पैशांसोबतच या पॅकेजबरोबर अजून काही गोष्टी देण्यात आल्यात ज्या पाहून तुम्हालाही नक्कीच हा जॉब करावासा वाटेल. येथील टी. एच. स्लिमेंट्स अ‍ॅण्ड सन लिमिटेड कंपनीने या नोकरीसंदर्भात ऑनलाइन जाहिरात दिलीय. वर्षभर शेतामध्ये कोबी आणि ब्रोक्ली तोडण्याच्या कामासाठी तासाला ३० पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार तीन हजारांहूनही अधिक रुपये मिळणार आहेत. वर्षभरासाठीच्या करारानुसार ६२ हजार ४०० पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार ६३ लाख ११ हजार ६४१ रुपये वेतन दिलं जाणार आहे. जॉब प्रोफाइलमध्ये हे अंग मेहनतीचं काम असून वर्षभर न थकता हे काम करावं लागणार आहे असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

जेवढं काम जास्त तेवढा पगार जास्त
या नोकरीसाठी ऑनलाइन जाहिरात करण्यात आली आहे. कंपनीला कोबी तोडणाऱ्या कामगारांची गरज असल्याचं एका जाहिरातीत म्हटलं आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये कोबी आणि ब्रोकोली तोडणार तेवढ्या प्रमाणामध्ये पगार दिला जाईल. या नोकरीमध्ये तासाला तीन हजारांहून अधिक कमवण्याची संधी आहे. हे काम पूर्ण वर्षभर असणार आहे. प्रत्येक तोडलेल्या कोबी किंवा ब्रोकोलीनुसार पगार निश्चित केला जाणार आहे. म्हणजे हे काम पिस वर्क पद्धतीचं अर्थात जेवढा भाजीचा तोडा निघणार तेवढे पैसे देण्यात येणार या तत्वावर केलं जाणार असल्याने अधिक पैसे कमवण्याचीही संधी आहे. कॉर्पोरेट सॅलरी पॅकेजलाही लाजवेल अशा या शेतीसाठीच्या ऑफरची सध्या इंटरनेटवर तुफान चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढा पगार देण्यामागील कारण काय?
युनायटेड किंग्डममध्ये कामागारांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळेच सरकार सीझनल अ‍ॅग्रीकल्चरल वर्कर्स स्कीम म्हणजेच ठराविक काळासाठी शेतीच्या कामांसाठी कामगारांना नियुक्त करण्याच्या धोरणाअंतर्गत परदेशामधून सहा महिन्यांच्या कालावधीची परवानगी देते. शेतांमध्ये काम करणारे मजूर उपलब्ध व्हावेत म्हणून ही सुविधा आहे. केवळ शेतीच नाही अनेक प्रकारच्या नोकऱ्यांसाठी युकेमध्ये संधी आहे. येथे इंधन वाहून नेणारे टँकर चालक कमी असल्याने इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र नुकतचं पहायला मिळालं होतं. यासाठी या टँकर चालकांचा पगार आता ७५ टक्क्यांनी वाढवलाय. अजूनही हा गोंधळ सुरु असतानाच आता शेतकमासाठी ही लाखो रुपयांची ऑफर देण्यात आल्याची जाहिरात समोर आलीय.