सध्या सोशल मीडियावर एका १७ वर्षांच्या मुलाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय या मुलाची चर्चा होण्याचं कारणही खास आहे. हो कारण त्याने या मुलाने आवड म्हणून गेम खेळून खेळून तब्बल १८ लाख रुपये कमावले आहेत. त्यामुळे आवड म्हणून व्हिडिओ गेम खेळणारा मुलगा लखपती बनल्याने अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. तर या गेममधून कमावलेले पैसे तो मुलगा शाळा आणि त्याचे इतर छंद पूर्ण करण्यासाठी वापरतो असं त्याने सांगितलं आहे. तर मुलाने पैसे कमावल्यामुळे आता त्याचे पालकही त्याला गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. शिवाय मुलाने त्याला केवळ गेमिंग क्षेत्रातच करिअर करायचंही असल्याचं सांगितलं आहे. हे प्रकरण इंग्लंडमधील ब्रिस्टल येथील आहे.
मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार, मैसन ब्रिस्टॉ असे या १७ वर्षीय मुलाचे नाव आहे. मैसन म्हणतो की, त्याने ‘रेक रूम गेम’ जी एक विनामूल्य मल्टीप्लेअर ऑनलाइन गेम आहे, ती खेळून तब्बल १८ लाख रुपये कमावले आहेत. या गेममध्ये, तुम्ही व्हर्च्युअल रूम तयार करू शकता आणि जगभरातील सहकारी गेमर्सशी कनेक्ट होऊ शकता. मैसन व्हर्च्युअल जगासाठी कंटेटही तयार करतो, यातून मिळालेले पैसे तो शाळेसह मित्रांसोबत फिरण्यासाठी वापरतो. गेममधून मिळालेल्या पैशातून त्याने स्वतःसाठी कपडे आणि बूटही खरेदी केले आहे, शिवाय याच पैशातून त्याने शाळेची फीही भरली आहे. मैसन २०१८ पासून गेम खेळत असून त्याच्या गेम खेळण्याला कुटुंबीयांचादेखील पाठिंबा आहे.
मैसन ब्रिस्टॉलमध्ये त्याच्या आई-वडीलांबरोबर राहतो. मैसन डिस्लेक्सिया या आजाराने ग्रस्त असतानाही तो खूप चांगल्या पद्धतीने गेम खेळतो. या आजारात लिहिताना आणि अभ्यास करताना अडचणी येतात. मात्र, मैसनने या अपंगत्वावर मात करत त्याला जे साध्य करायचं होतं ते केलं आहे. मैसन म्हणाला “मला जेव्हा पहिले पैसे मिळाले तेव्हा मी खूप घाबरलो होतो, शिवाय मला ही कंपनी पैसे पाठवेल की नाही याची खात्री नव्हती. परंतु महिनाभरानंतर मला पैसे मिळाले, पण माझ्या बँक खात्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम असल्याने मला धक्का बसला.”