Viral Video: आर्थिक परिस्थितीमुळे अनेक लोकांकडे शिक्षण, नोकरी, घर आदी गोष्टी नसतात. त्यामुळे पोटापाण्यासाठी ते सगळीकडे फिरून अन्न, तर ट्रेनमध्ये किंवा सिग्नलवर उभे राहून पैसे मागताना दिसतात. पण, काही लोक त्यांची परिस्थिती पाहून मोठ्या मनाने त्यांना मदत करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुटुंबासाठी रस्त्यावर पैसे आणि अन्न शोधणारा चिमुकला एका तरुणीजवळ त्याची व्यथा मांडताना दिसला आहे.
व्हायरल व्हिडीओ एका तरुणीने तिच्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. एक तरुणी रस्त्यावर अन्न आणि पैसे गोळा करणाऱ्या आठ-नऊ वर्षांच्या चिमुकल्याशी बोलताना दिसत आहे. घरातील जबाबदारीमुळे तो रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. घरावर आर्थिक संकट असूनदेखील चिमुकला चेहऱ्यावर हास्य ठेवून रस्त्यावर मदत मागताना दिसत आहे. तरुणी त्याला काही प्रश्न विचारते, तेव्हा तो त्याची हृदयस्पर्शी गोष्ट सांगून मदत करण्यास सांगतो. चिमुकल्याचा भावुक व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…Saree Hacks : रबर बँडच्या मदतीने करा परफेरक्ट साडीच्या निऱ्या; अनोखा जुगाड, पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मुलगा गाडीत बसलेल्या तरुणीशी बोलत असतो. जेव्हा तरुणी मुलाला विचारते की, शाळेत जात नाहीस का? त्यावर मुलगा सांगतो, शाळेतून माझं नाव काढून टाकलं आहे, कारण माझ्यावर घराची जबाबदारी आहे. माझी एक बहीण मरण पावली आहे, तर आणखीन तीन लहान भाऊ मला आहेत, असे तो मुलगा सांगतो. यानंतर मी तुझी काय मदत करू असे तरुणी विचारते? त्यावर मला पीठ घेऊन दे, अशी मागणी चिमुकला तरुणीकडे करतो. यानंतर तरुणी त्याला दुकानात घेऊन जाते आणि १० किलो पीठ घेऊन देते. हे बघताच आज आई खुश होईल असे चिमुकला म्हणताना दिसतो आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chaprajhila या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘कोणत्या वयापर्यंत अभ्यास करावा, कोणत्या वयात कमवावे? हा छंद नाही, परिस्थिती ठरवते’ अशी भावुक कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून काही जण तरुणीचे कौतुक करत आहेत, तर चिमुकल्याची गोष्ट ऐकून अनेक जण भावुक होताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.