सचिनच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या दोन चाहत्यांनी शाळेच्या पटांगणात भव्य रांगोळी साकारली होती. सचिनचा ४४ वा वाढदिवस, क्रिकेटमधली त्याची २४ वर्षांची कारकीर्द अशा संकल्पनेतून अभिषेक साटम आणि संदिप बोबडे या दोन मित्रांनी ४४ फूट लांब आणि २४ फूट रुंद अशी भव्य रांगोळी एप्रिल महिन्यात साकारली होती. या रांगोळीची दखल ‘इंडिया बुक रेकॉर्ड’नं घेतली असून या रांगोळीच्या नावे ‘युनिक बर्थडे गिफ्ट’ आणि ‘युनिक रांगोळी’ अशा दोन विक्रमांची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षभरात भारतात नोंदवल्या गेलेल्या १०० विक्रमांमध्ये अभिषेक आणि संदिपच्या भव्य रांगोळीचाही समावेश झाला आहे. २४ एप्रिल २०१७ मध्ये परळच्या आर.एम.भट्ट शाळेच्या पटांगणात या दोघांनी मिळून रांगोळी काढली होती. रांगोळी काढण्यासाठी दोघांनाही दोन दिवस लागले होते. या रांगोळीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून ही सर्वात मोठी भेट असल्याचं अभिषेकनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं. याशिवाय ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी नोंदणी केल्याचेही अभिषेकने सांगितले.
भेटा भातुकलीच्या खेळामधल्या खऱ्याखुऱ्या ‘बाहुली’ला
अभिषेक हा लहानपणापासून सचिनचा ‘जबरा फॅन.’ आहे, त्याची छोटीशी खोली सचिनच्या फोटोंनी भरलेली आहे. सहा वर्षांचा असल्यापासून त्याने सचिनशी निगडीत एकूण एक गोष्टींचा संग्रह करायला सुरूवात केली. या संग्रहात १५ वर्षांपासूनच्या वर्तमानपत्रातील लेख, ३० हून अधिक पुस्तकं, २०० हून जास्त साप्ताहिकं, मासिकं आहेत. यात तीस हजारांहून अधिक छायाचित्रं, पंधरा हजारांहून अधिक लेख आहेत. सचिनचे फोटो असणारे बॉलपेन, कोल्डड्रिंक्सचे टीन अशा वस्तूही या संग्रहात आहेत आणि दिवसेंदिवस अभिषेकचा हा संग्रह वाढतच जात आहे. सचिनची स्वाक्षरी असणारी एक सोन्याच्या मुलाम्याची बॅटही अभिषेककडे आहे.