मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन चार तरुणांनी कोलकातामध्ये राहणारी अभिनेत्री कंचना मोईत्रा हिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे. या तरूणांनी भररस्त्यात तिला सर्वांसमक्ष उठाबशा काढायला लावल्या. तसेच चालकाला आपल्यावर हात उगारायला लावल्याचा आरोप तिने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शूटिंग संपवून घरी परतत असताना कंचनाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काही तरूणांनी रोखले. कंचनाच्या गाडीमुळे त्यांना अपघात होणार होता आणि या अपघातातून ते थोडक्यात बचावले, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून कंचना आणि तिच्या चालकाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी तिची गाडी वाटेत रोखली. तिला गाडीतून उतरवून ४० उठाबशा काढायला लावल्याचा आरोप तिने केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या चालकाला कानशिलात लगावण्यासाठीही भाग पाडल्याचं तिने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

वाचा : #MondayMotivation’, ‘#TravelTuesday’, ‘#WisdomWednesday’ म्हणजे काय रे भाऊ?

रस्त्यात हा सारा तमाशा सुरू असताना इतर लोक बघ्याची भूमिका घेत असल्याचंही तिने ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. माझ्या गाडीने या मुलांना धडक दिली नसून, ती एका दगडाला आदळली होती. पण संबंधित तरुण खोटं बोलत असून, नशेत त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचं तिचं म्हणणं आहे. या तरुणांनी शिवीगाळ केली आणि पोलिसात तक्रार न करण्याची धमकी दिली, असेही ती म्हणाली. हा संपूर्ण प्रकार सुरू असताना साधारण २० मिनिटांनंतर पोलिसांची गस्त घालणारी गाडी आली. कंचनाने धावत जाऊन पोलिसांना तिच्यासोबत घडलेला सारा प्रकार सांगितला. पोलिसांना पाहताच तरुण पळून गेले. पण त्यातला एका तरुणाला पकडण्यात पोलिसांना यश आलं. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आणखी दोन तरुणांना अटक केली. यातला एक तरुण कोलकातामध्ये रंगरंगोटीचे किरकोळ कामं करतो तर दुसरा टॅक्सीचालक आहे.

Video : याला म्हणतात ‘खिलाडूवृत्ती’! पाहा शर्यत पूर्ण करण्यासाठी तिने काय केलं

या संपूर्ण प्रकरणामुळे आपल्याला मनस्ताप झाला असून, स्वतःच्याच शहरात इतका वाईट अनुभव मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीच घेतला नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kanchana moitra asked to do 40 sit ups by drunken men
First published on: 20-09-2017 at 12:56 IST