सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाउनमुळे अर्थचक्रही थांबलं आहे. तर दुसरीकडे उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला आहे. उद्योजकांना आपल्या स्टार्टअप्सना सक्षम बनवण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
“स्टार्टअप्सना सक्षम बनण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करणं आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीतून बाहेर पडत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी त्यांना नवे मार्ग शोधणं आवश्यक आहे. हे नवे मार्ग येणाऱ्या काळात बेन्चमार्क ठरतील,” असं मत रतन टाटा यांनी व्यक्त केलं. त्यांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “सध्याच्या काळातील आव्हानं आणि अडचणींना कमी लेखू इच्छित नाही. आता ते कोऱ्या कागदावर नवीन मजकूर लिहिण्यासारखं असू शकतं. आता आपल्याला यापूर्वी कधीही विचार न झालेल्या अशा कार्य करण्याच्या पद्धतींकडे लक्ष दिलं पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.
यापूर्वीही मोठ्या समस्या
सध्याच्या संकटानंतर उद्योजकांना काम करण्याचा एक चांगला मार्ग मिळेल, अशी आशा रतन टाटा यांनी व्यक्त केली. करोना व्हायरसमुळे जी परिस्थितीत निर्माण झाली आहे त्यामुळे भारतासहित अन्य देशांच्याही आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वीही अशी अनेक संकटं आली. त्यावेळी उद्योजकांनी दूरदृष्टी ठेवून आणि रचनात्मकरित्या काम केलं. आज ते इनोव्हेशन आणि नव्या तंत्रज्ञानाला पुढे आणणाऱ्यापैकी एक ठरले आहेत, असं ते म्हणाले. ” हे संकट उद्योजकांना नव्या बाबी आत्मसाद करण्यासाठी आणि काही नवं करण्यासाठी प्रेरिक करेल असा मला विश्वास आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.