एअर इंडियाच्या (Air India) दिल्ली लंडन AI-111 या विमानाने लंडनसाठी टेक ऑफ केलं. त्यानंतर एका प्रवाशांचं क्रू मेंबर्ससोबत भांडण झालं. त्यामुळे हे विमान पुन्हा एकदा दिल्लीत लँड करण्यात आलं. आम्हाला नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे. तसंच या घटनेबाबत आम्ही विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या प्रवाशाला दिल्ली विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे असंही एअर इंडियाने सांगितलं आहे.

एअर इंडियाने नेमकं काय म्हटलं आहे?

एअर इंडियाने या प्रकरणात एक पत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे आम्हाला दिल्लीत आणावं लागलं. कारण या विमानात एका प्रवाशाने आमच्या क्रू मेंबर्ससोबत वाद घातला, भांडण केलं. या प्रवाशाची आम्ही समजूत घातली, इशारा दिला, लेखी इशाराही बजावला. तरीही या प्रवाशाने भांडण करणं सोडलं नाही. त्याने क्रूच्या सदस्यांसह मारामारी केली. त्यामध्ये दोघांना जखम झाली आहे. या घटनेनंतर आम्ही विमान दिल्लीला परत आणलं. विमान लँड केल्यानंतर आम्ही या प्रवाशाला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं आहे त्याच्या विरोधात FIR ही नोंदवला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार या विमानात २५५ प्रवासी बसले होते. या विमानातला हा प्रवासी अचानक हिंसक झाला. नियमबाह्य वर्तन त्याने सुरूच ठेवलं. त्यानंतर त्याने मारामारी करून दोन क्रू मेंबर्सना जखमीही केलं. त्यामुळे आम्ही विमान दिल्लीत आणलं आणि या प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधीन केलं असं एअर इंडियाने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकाराच्या घटना पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे बराच गदारोळही झाला होता. एअर इंडियाच्या न्यूयॉर्क दिल्ली विमानात काही महिन्यांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता ज्यामध्ये बिझनेस क्लासमधल्या एका प्रवाशाने ७० वर्षीय महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचा कथित आरोप आहे. हे प्रकरण तर थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आहे.