US Women Speaking In Marathi: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषेविषयी वाद सुरू आहे. अशात एका अमेरिकन महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अमेरिकन महिला तिच्या महाराष्ट्रीय पतीसाठी मराठी शिकल्याचे सांगत मराठीत बोलत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमेरिकन महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कंटेंट क्रिएटर कॅन्डेसने ती तिचा पती अनिकेतची मातृभाषा शिकत असल्याचे सांगितले आहे. यावेळी तिने स्पष्ट केले की, तिला अजून पूर्णपणे मराठी येत नाही.
पण, या व्हिडिओमध्ये ती मराठीत “शुभ सकाळ”, “कसा आहेस”, “रात्रीच्या जेवणासाठी काय आहे”, “नमस्कार” आणि “धन्यवाद” यासारखे शब्द आणि वाक्ये बोलत असल्याचे आणि यावर तिचा पती प्रेमाने हसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“मी परिपूर्ण नाही, पण मी प्रयत्न करत आहे. कृपया माझ्याशी नम्रतेने वागा”, असे कॅन्डेसने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
ही अमेरिकन महिला मराठी बोलत असल्याचे पाहून काही सोशल मीडिया युजर्स प्रभावित झाले आहेत. त्यांनी या व्हिडिओचा संबंध महाराष्ट्रात मराठी भाषेत बोलण्याच्या मुद्द्याशी आणि मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्यांना कथित मारहाण केल्याच्या घटनांशी जोडला.
एका युजरने म्हटले, “ही अमेरिकन महिला मराठी बोलत असल्याचे पाहून मनसे कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले असतील.” यावर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “हे पाहून मनसेला खूप अभिमान वाटेल.”
आणखी एक युजर म्हणाला, “तुम्ही त्याच्याशी त्याच्या मातृभाषेत बोलत असतानाचे त्याचे हास्य सांगते की, ‘म्हणूनच मला ही महिला आवडते’.”
काही इन्स्टाग्राम युजर्सनी तिला आणखी काही मराठी वाक्ये शिकवण्यासाठी मदत केली आणि म्हटले, “पुढच्या वेळी ‘अहो, ऐका’ म्हणा आणि त्याला ब्लश करताना पहा.” दुसऱ्या युजरने स्पष्ट केले, “मराठी स्त्री तिच्या नवऱ्याला ‘अहो’ म्हणून हाक मारते.”