विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभाग (एनसीबी) काम करीत असून फडणवीस यांचे निकटवर्तीय कार्यालयात वावरत आहेत, असा आरोप करीत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांचे ड्रग्ज माफियाबरोबरचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत सोमवारी केले. त्यावर एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी संबंधित संस्थेच्या व्यक्तींबरोबर आलेल्या काही जणांनी आम्हा दोघांबरोबर छायाचित्रे काढून घेतली होती. उलट मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असून त्याबाबतचे पुरावे दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि प्रसिद्धीमाध्यमांना देणार असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत नवाब मलिक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांचा तोल सुटल्याचं पहायला मिळालं. सध्या त्यांच्या या वक्तव्याची फार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरुन प्रश्न विचारताना पत्रकाराने जाणीवपूर्वक आरोप केले जात आहेत का असं नवाब मलिक यांचं नाव घेत प्रश्नामध्ये विचारलं. त्यावेळी बोलताना अमृता यांनी, “नक्कीच जाणीवपूर्वक केलं जातंय. आमच्याकडे काहीच नाहीय जे ते एक्सपोज करु शकतात. आमच्याकडे ना लॅण्ड बँक आहेत, ना साखर कारखाने आहेत. त्यामुळे नॅचरली ते (विरोधक) आमच्यावर च***. आम्ही कोणाला घाबरत नाही तर च****,” असं उत्तर दिलं. टीका करणार या शब्दाऐवजी अमृता यांनी प्रमाण भाषेत नसणारा खालच्या पातळीवरील शब्द पत्रकार परिषदेमध्ये वापरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मलिक यांनी काय आरोप केले?
मध्यस्थाचे काम करणाऱ्या नीरज गुंडे यांचे फडणवीस यांच्याशी संबंध असून ते एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या संपर्कात असतात. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून एनसीबीची कारवाई सुरू असून मोठे मासे बाहेरच असल्याचा आरोप मलिक यांनी केला. मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलधर हे वैधानिक पदावर असताना समीर वानखेडे यांची भेट घेऊन प्रसिद्धीमाध्यमांमधून वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांचे उत्तर
मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, माझ्याविरोधात काही आरोप करता येत नसल्याने पत्नीसंबंधातील छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकण्यात आले आहे. संबंधित कार्यक्रम कंपनीने त्याबाबत खुलासा केला असून अटक झालेल्या व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही. मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध गुन्हेगारी जगताशी आहेत, अशांनी अमली पदार्थांबाबत बोलू नये, असेही फडणवीस यांनी बजाविले. मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, मी दिवाळीनंतर मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधातील पुरावे जाहीर करून बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तर चोराच्या उलट्या बोंबा, विनाशकाले विपरीत बुद्धी, असे प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी मलिक यांना दिले आहे.