समाजात ज्याप्रमाणे सामाजिक भान राखणारे किंवा मदतीचे हात पुढे करणारे लोक असतात, त्याप्रमाणेच काही समाजकंटकही असतात. अशाच एका समाजकंटकाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मुंबईतल्या अंधेरी परिसरातला आहे. एक रिक्षेवाला रात्रीच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला आहे. हा व्हिडीओ अंधेरी पश्चिमेतल्या आराम नगर या भागातील आहे. रात्रीच्या वेळी एक रिक्षावाला रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवतो. त्यानंतर रिक्षात मागे बसलेली व्यक्ती उतरून ड्रेनेज लाइनचं लोखंडी झाकण उघडून ते तोडताना दिसत आहे.

जिथे हा सर्व प्रकार घडला, तिथे समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. ही व्यक्ती रिक्षातून उतरून ते लोखंडी झाकण तोडण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर ते झाकण उघडून तुटलेल्या अवस्थेत ठेवतात. प्रथमदर्शनी पाहताना ही व्यक्ती हे लोखंडी झाकण चोरून नेण्याच्या उद्देशाने काढत आहे की काय असाच अंदाज येतो. मात्र, ही समाजकंटक व्यक्ती केवळ चोरण्याचाच विचार करत नव्हती, तर ते ड्रेनेजचं झाकण उघडं करून तिथून निघून गेली.

रात्रीच्या वेळी अन्य कोणीही व्यक्ती रस्त्याच्या कडेने चालत असेल तर त्या ड्रेनेजमध्ये पडण्याची भीती आहे. ड्रेनेजचं झाकण उघडून ते तसंच ठेवणं ही विकृतीच असावी, कारण व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ड्रेनेज लाइन अगदी लहान चौकोनी आकाराची आहे, त्यामुळे ती पटकन दिसण्यात येईल असं नाही. शिवाय यामुळे अपघातही होऊ शकतात, त्यामुळे या समाजकंटकाच्या अशा विकृत वागणुकीमुळे नेटकरी या व्हिडीओवर संताप व्यक्त करत आहेत. दहिसरकर या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अनेकांनी यावर संताप व्यक्त करत याची रिक्षा जप्त करा आणि फोडून काढा अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी याने पोलिसांना ५०० रुपये टेकवले असतील आणि निघाला असेल असेही म्हटले आहे; तर आणखी एकाने पोकळ बांबूव्यतिरिक्त अशा लोकांसाठी काही कायमस्वरूपी उपाय आहे का असा प्रश्नही विचारला आहे.