Bengaluru Women Videos Instagram: सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उद्यानात फिरणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह आणि विनासंमती चित्रीकरण करून ते व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याप्रकरणी बंगळुरूतील इन्स्टाग्राम पेजवर कारवाई करण्यात आली आहे. इंडिया वॉक १ केएम या पेजवरून ट्रॅव्हल आणि स्ट्रिट फॅशनच्या नावाखाली महिलांचे चुकीच्या पद्धतीने चित्रीत केलेले व्हिडीओ शेअर केले जात होते. यावर वाद निर्माण झाल्यानंतर आता बंगळुरू पोलिसांनी सदर इन्स्टाग्राम पेज चालविणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, केआर पुरम परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय गुरदीप सिंगला अटक करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटला ११ हजार फॉलोअर्स होते. बंगळुरूतील चर्च स्ट्रिट आणि कोरमांगला या रहदारीच्या रस्त्यावरील अनेक महिलांचे व्हिडीओ चित्रीत करून या पेजवर शेअर करण्यात आले होते. सदर व्हिडीओ आक्षेपार्ह पद्धतीने चित्रीत केल्यामुळे टीका होऊ लागली होती.
काही व्हिडीओंमध्ये कॅमेरा मागे येत असल्याचे दिसल्यामुळे काही महिला अस्वस्थ झाल्याचेही दिसत आहे. तरीही ते व्हिडीओ तसेच पोस्ट करण्यात आले होते. केवळ लाइक्स आणि व्ह्यूज वाढविण्यासाठी हा प्रकार केल्याचे आता पुढे आले आहे.
विद्यार्थीनीच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
एका विद्यार्थीनीला स्वतःचाच व्हिडीओ या अकाऊंटवर दिसल्यानंतर तिला धक्काच बसला. तिच्या परवानगीशिवाय सदर व्हिडीओ चित्रीत करण्यात आला होता. तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तिला ऑनलाईन त्रास सहन करावा लागला होता. या विद्यार्थीनीने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत तिला भोगावा लागलेल्या मानसिक त्रासाची माहिती दिली. तिने सदर इन्स्टा पेज चालविणाऱ्या व्यक्तीला हा व्हिडीओ काढून टाकण्याची विनंती केली होती. मात्र त्याने तिच्या मागणीला धुडकावून लावले.
सदर विद्यार्थीनीची पोस्ट व्हायरल होताच. इंटरनेटवर संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी सदर पेज बंद करण्यात यावे, अशी मागणी केली. बंगळुरू सायबर पोलिसांनाही अनेकांनी टॅग करत डिजिटल शोषण करणाऱ्या या पेजवर कारवाई करावी, अशी विनंती केली. यानंतर बंगळुरू पोलिसांनी आरोपीला अटक केली.
आरोपीची चौकशी केली असता तो दररोज कामाला येता जाता १३ व्हिडीओ गुपचूप चित्रीत करत असल्याचे समोर आले. चित्रीत केलेले व्हिडीओ प्रसिद्धीसाठी इन्स्टावर शेअर केले जात होते, अशी चौकशीतून समोर आले.