पाळीव कुत्रा मेल्याचे दु:ख अनावर झाल्याने १९ वर्षांच्या तरूणीनं आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवण्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. जेमिनी असं या तरुणीचं नाव आहे. जुलै महिन्यात तिच्या कुत्र्याचा मृत्यू झाला होता. तो गेल्याचं दु:ख तिला होतं, त्याच्या जाण्यानंतर कित्येक दिवस ती तणावात होती. त्यातून कुत्रा मेला म्हणून नको इतका शोक करतेस असं म्हणतं तिचे मित्र मैत्रिणी तिची टर खेचायचे, या सगळ्याचा त्रास असह्य झाल्यानं तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जेमिनी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिला सोबत म्हणून तिच्या आईवडिलांनी घरात कुत्रा पाळला होता. गेल्या चार वर्षांपासून तिच्या तो सोबत होता. पण आजारपणामुळे त्याचा जुलै महिन्यात मृत्यू झाला. या धक्क्यातून जेमिनी सावरली नाही म्हणून तिनं आत्महत्या केल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.  आपला कुत्रा जिम्मीचा मृत्यू होण्याचं दु:ख तिला होतं. त्यामुळे ती सतत तणावात असायची. तिला यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबीयांनी आठवड्याभरापूर्वी नवीन कुत्राही आणला होता. त्याचं नाव देखील जिम्मीच ठेवलं होतं. नवीन कुत्रा आल्यानंतर ती कदाचित या धक्क्यातून सावरेल असं सगळ्यांना वाटलं पण तिनं टोकचं पाऊल उचलून आपलं आयुष्य संपवलं अशी माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली.