बिहारमधील सीतामढी इथल्या एका महिलेला नाग चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, तिला रूग्णालयात नेण्याऐवजी या महिलेच्या पतीने आणि इतर गावकऱ्यांनी तिच्यावर भूतविद्या आणि अंधश्रद्धा करण्याचा प्रयत्न केला. असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, महिला जमिनीवर पडलेली दिसत आहे. तिच्याभोवती अनेक लोक जमले आहेत आणि ते भूतविद्या करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातल्या एका पुरूषाने काठीने नागाला ढकलत त्या महिलेवर पोहोचवले आणि तो या महिलेच्या शरीरातून विष परत शोषून घेईल असा अंधविश्वास या लोकांमध्ये आहे. हा नाग महिलेला कसा चावला याबाबत माहिती नाही, पण तो पुन्हा तिला चावा घेऊन विष शोषून घेईल अशी अंधश्रद्धा या महिलेच्या जीवावर बेतू शकते. व्हिडीओमधील दृश्यांवरून ही भूतविद्या असल्याचे लोकांनी म्हटले आहे. शिवाय यावेळी नाग अनेकदा त्या महिलेला चावताना दिसत आहे. दरम्यान, या महिलेच्या सद्यस्थितीबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
साप चावल्यास काय करावे?
एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्वरित उपचारात्मक हालचाल करणे आवश्यक आहे. विष शरीरात लवकर पसरू नये म्हणून पीडित व्यक्तीला शांत ठेवावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी. चावा घेतलेल्या जागेला साबणाने आणि पाण्याने हळूवार धुवावे. त्यानंतर साप चावलेल्या त्या व्यक्तीला विलंब न करता जवळच्या रूग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात घेऊन जावे.
शैलेंद्र शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने एक्सवर हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. संबंधित घटना बिहारमध्ये घडलेली आहे असे सांगण्याच येत आहे. तसंच या महिलेला नाग कसा चावला आणि त्यानंतर तिथे नेमकं काय घडलं याबाबतची काहीच माहिती उपलब्ध नाही. मात्र, तिला नाग चावल्यानंतर उपचार मिळाले नसतील तर तिचा जीव वाचला की नाही याबाबतही काही माहिती उपलब्ध नाही. या व्हिडीओमधील दृश्य मात्र विचलित करणारी आहेत.