Lionel Messi Birthday : ‘ही’ आहेत लिओनेल मेस्सीला GOAT म्हणण्यामागची कारणे

Lionel Messi Birthday Special : अर्जेंटिना आणि जगभरातील असंख्य फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला लिओनेल मेस्सी आज २४ जूनला आपला ३५वा वाढदिवस साजरा करत आहे.

Lionel Messi Birthday Special
त्याने आजवर असंख्य विक्रम मोडले आहेत आणि असंख्य नवीन विक्रम प्रस्थापितही केले आहेत. (फोटो : AP/Reuters)

Happy Birthday Lionel Messi : अर्जेंटिना आणि जगभरातील असंख्य फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला लिओनेल मेस्सी आज (२४ जून) ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. हा प्रतिष्ठित फुटबॉलपटू गेल्यावर्षी बार्सिलोनामधून फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मेनमध्ये गेला. फुटबॉलमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेला मेस्सी ड्रिब्लिंग, भेदक नजर, चेंडू पास करण्याची क्षमता आणि झटपट गोल करण्याच्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आजवर असंख्य विक्रम मोडले आहेत आणि असंख्य नवीन विक्रम प्रस्थापितही केले आहेत.

ला मासिया या बार्सिलोनातील प्रसिद्ध युवा अकादमीचा पदवीधर असलेल्या मेस्सीने वयाच्या १७ व्या वर्षी वरिष्ठ संघात पदार्पण केले. अर्जेंटिनाचा दिग्गज डिएगो मॅराडोनासुद्धा मेस्सीला आपला उत्तराधिकारी मानतो. कारण, त्याने अर्जेंटिनाला फिफा २०१४ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले होते. याशिवाय, कोपा अमेरिका २०२१ ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकून राष्ट्रीय ट्रॉफीची दीर्घ प्रतीक्षाही संपवली.

मेस्सीच्या ३५व्या वाढदिवसानिमित्त त्याने केलेल्या अविश्वसनीय कामगिरीवर एक नजर टाकूया.

रेकॉर्ड बॅलन डी’ओर विजेता

लिओनेल मेस्सीने बॅलोन डी’ओर हा बहुमान जिंकला आहे. एका वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा बहुमान दिला जातो. मेस्सीने आतापर्यंत सात वेळा अशी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.२००९ मध्ये त्याने पहिल्यांदाच बॅलन डी’ओर ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यानंतर २०१०, २०११ आणि २०१२ मध्ये सलग चार वेळा ही ट्रॉफी आपल्या नावावर केली.

प्रसिद्ध एमएसएन (मेस्सी, सुआरेझ, नेमार) यांच्यासह केलेल्या कामगिरीमुळे त्याला २०१५ मध्ये त्याचे ५वे विजेतेपद जिंकण्यास मदत झाली. यानंतर त्याला त्याची सहावी बॅलन डी’ओर ट्रॉफी उचलण्यासाठी २०१९ पर्यंत वाट पहावी लागली. शेवटी २०२१ मध्ये कमकुवत बार्सिलोना संघाला एकट्याने सावरून त्या हंगामात सातव्यांदा हा बहुमान मिळवला.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

क्लब आणि देशासाठी टॉप स्कोअरर

मेस्सीने बार्सिलोनासाठी सर्व स्पर्धांमध्ये एकूण ७२४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६३० गोल केले आहेत. म्हणजेच त्याने प्रत्येक गेममध्ये सरासरी ०.८७ गोल केले आहेत. तो स्पॅनिश लिजंटससाठी सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने स्पेनच्या टॉप-फ्लाइट लीग, ला-लीगा या स्पर्धांमध्ये सर्वाधिक ४४३ गोल केले आहेत. त्याच्या नावावर असलेल्या ८६ आंतरराष्ट्रीय गोलसह, मेस्सी अर्जेंटिना राष्ट्रीय संघासाठी सर्वकालीन गोल करणाऱ्यांच्या क्रमवारीत आघाडीवर आहे. यापैकी सहा गोल त्याने फिफा विश्वचषकात आणि नऊ गोल कोपा अमेरिका स्पर्धेत केले आहेत.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक गोल

मेस्सीने २०१२ साली केवळ ६९ सामन्यांमध्ये तब्बल ९१ गोल केले होते. एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही खेळाडूने वैयक्तिकरित्या केलेले सर्वाधिक गोल म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याच्या या पराक्रमाची नोंद झालेली आहे. या ९१ गोल पैकी ७९ गोल बार्सिलोना कलर्सकडून आणि उर्वरित १२ राष्ट्रीय संघाकडून खेळताना केले होते.

एकाच सत्रात फुटबॉलमधील सर्व प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले

मेस्सी हा एकमेव खेळाडू आहे ज्याने एकाच सत्रात फुटबॉलमधील सर्व चार प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत. ज्यात बॅलन डी’ओर, फिफा वर्ल्ड प्लेयर, पिचिची ट्रॉफी आणि गोल्डन बूट पुरस्कार यांचा समावेश आहे. २००९-१० च्या हंगामात त्याने ही कामगिरी केली होती.

गोलसाठी सर्वाधिक वेळा सहाय्यकांची भूमिका निभावली

मेस्सीला एक परिपूर्ण खेळाडू म्हटले जाते. तो मैदानात असताना फक्त स्वत:च्याच नाही तर इतर खेळाडूंच्या खेळावर लक्ष देतो. तो जगातील अव्वल प्लेमेकर्सपैकी एक आहे. त्याने आपल्या ‘टिकी-टाका’ शैलीमुळे कारकिर्दीत ३६८ गोलसाठी सहाय्य केले आहे. फुटबॉलच्या इतिहासात अशी कामगिरी अद्याप कुणालाही जमलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Birthday special these are the reasons behind calling lionel messi a goat pvp

Next Story
“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे ३६ आमदार नेले, आता कसं वाटतंय?”; मुंबईत मनसेची शिवसेनेविरोधात बॅनरबाजी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी