पाणीपुरीनंतर सुखापुरी, सँडविच खाल्ल्यावर बटाट्याचे काप आणि बाजारात भाजी पाला खरेदी करायला गेल्यानंतर त्याबरोबर कोथिंबीर आणि कडिपत्ता फ्रीमध्ये घेऊन येण्याचा आपल्याकडे एक अलिखित नियमच आहे. या गोष्टीतही एक वेगळी मज्जा असते. जर कधी पालेभाज्या खरेदी केल्यावर मोफत मिळणारा कडीपत्ता आणि कोथिंबीर मिळाली नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. ब्लिंकिट (Blinkit) सारख्या ऑनलाइन भाजीपाला विकणाऱ्या कंपनीला मात्र कदाचित हा नियम माहित नसावं म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे एक ऑर्डर पाठवली होती. पण ही डिलिव्हरी ऑर्डर करणाऱ्या महिलेला याचा इतका धक्का बसला की तिने ब्लिंक इटवाल्यांना आपली पॉलिसीच बदलायला भाग पाडलं.

याच प्रकरणावर प्रकाश टाकणारी एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये युजरने लिहिलंय की “ब्लिंकिट (Blinkit) वरून भाजीपाला ऑर्डर करूनही कोथिंबीर आणि कडिपत्ता मिळवायला वेगळे पैसे द्यावे लागत आहेत. हे आईला आवडलेलं नाही आणि पटलेले नाही. आईने असा सल्ला दिला आहे की जर कोणी ठराविक प्रमाणात भाजीपाला ऑर्डर करत असेल तर त्यांना कोथिंबीर आणि कडीपत्ता मोफत मिळाला पाहिजे.” या पोस्टने अनेक युजर्सचे लक्ष वेधून घेतले.ज्यामध्ये कंपनीचे संस्थापक अलबिंदर धिंडसा हे देखील होते. त्यांनी पोस्टवर “करूयात” अशा शब्दात कमेंट केली. दरम्यान, काही तासांनंतर त्यांनी त्यावर सविस्तर माहिती देणारी दुसरी एक पोस्ट टाकली. त्यांच्या या पोस्टने ब्लिंकिट (Blinkit) वरून ऑर्डर करणारे ग्राहक खुश होऊन गेले.

तर त्याच झालं असं की एक्स युजर अंकित सावंतने लिहिलेल्या पोस्टमुळे या सगळ्याची सुरवात झाली. त्याने लिहीलं की माझ्या आईला थोडा धक्का बसला, जेव्हा तिला ब्लिंकिट (Blinkit) वर एरवी बाजारात मोफत मिळणाऱ्या कोथिंबीरसाठी वेगळे पैसे मोजावे लागतात हे कळलं. आईचा सल्ला आहे की ग्राहकांकडून एका ठराविक प्रमाणात खरेदी होत असेल तर त्याबरोबर कोथिंबीर आणि कडिपत्ता मोफत दिला गेला पाहिजे.

या पोस्टनंतर काही तासांनी कंपनीचे संस्थापक अलबिंदर धिंडसा यांनी एक पोस्ट केली ज्यात त्यांनी म्हटले की, “आता ही सेवा सुरु झाली आहे, यासाठी सर्वांनी अंकितच्या आईला धन्यवाद द्या”. त्यांनी अॅपचा एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये काही भाज्या खरेदी केल्यानंतर १०० ग्रॅम कोथिंबीर मोफत मिळवण्याचा पर्याय दिसत आहे.

ही पोस्ट टाकल्यापासून या पोस्टला आत्तापर्यंत ३ लाखांहून अधिक Views आहेत. या पोस्टने मोठ्या प्रमाणावर लोकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टला ३९०० लाईक मिळाल्या आहेत तर अनेकांनी पोस्ट शेअरही केली आहे. पोस्टवर कमेंट्सचा तर पाऊस पडला आहे.“व्वा! वाऱ्याच्या वेगाचा निर्णय,” अशा शब्दात एका एक्स युजरने लिहिलं आहे. “यार, खरचं, हे आश्चर्यकारक आहे” असं दुसऱ्या युजरने लिहिले आहे. तर आणखी एका युजरने “हे अक्षरशः प्रत्येक आईचे असेच असते, पण धन्यवाद! हे ऐकून माझ्या आईलाही आनंद होईल,” अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्लिंकिट (पूर्वीची ग्रोफर्स) ही कंपनी संस्थापक अलबिंदर धिंडसा यांनी २०१३ मध्ये सुरू केली. ही कंपनी २०२२ मध्ये झोमॅटोने विकत घेतली. मूळची गुरुग्राममधील ही कंपनी सध्या देशभरातील २६ शहरांमध्ये कार्यरत आहे.