सणवार म्हटले की सुटी……विविध प्रकारचे मिष्टान्न….कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत साजरा करण्याचा खास दिवस आणि बरेच काही…मात्र काही कारणाने हे सणवार आपल्याला आपल्या घरी साजरे करता आले नाहीत तर? अशावेळी दुःखी न होता सणाचा आनंद घेता यावा हा विचार करुन केएलएम रॉयल डच एअरलाईनने आपल्या प्रवाशांसाठी काही खास नियोजन केले आहे. एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तर ही अनोखी भेटच ठरली.

नाताळदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे एकटेपण दूर व्हावे या हेतूने एअरलाईन्सतर्फे या विशेष बुफेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला केवळ भिंत असल्याचे पाहून अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले मात्र भिंतीच्या वरच्या बाजूला असलेले पदार्थ प्रवासी त्या भिंतीच्या बाजूला असणाऱ्या गोलाकार खुर्च्यांवर बसल्यावरच खाली येत असल्याचे काहींच्या लक्षात आले. काही प्रवासी या ठिकाणी बसले तरीही हे पदार्थ खाली न आल्याने नंतर अनेकजण इतर प्रवाशांना या बुफेचा आनंद घेण्यासाठी बोलवायला लागले. यातील सगळ्या खुर्च्यांवर लोक बसल्यावरच भिंतीवरुन हे जेवण प्रवाशांच्या समोर आले. अशाप्रकारे अनोळखी सहप्रवाशांना आमंत्रित करणाऱ्या या बुफेला एअरलाईन्सकडून बाँडिंग बुफे म्हणजेच एकमेकांमधील संबंध दृढ करणारे जेवण असे अतिशय आकर्षक नावही देण्यात आले होते. या बुफेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एकट्याने प्रवास करत असताना आपल्यासाठी एअरलाईन्सकडून अशा पद्धतीने झालेल्या कौतुकाने प्रवासीही आनंदून गेले. या बुफेमध्ये प्रवाशांना ख्रिसमस पार्टीमध्ये असणारे केक, शीतपेये यांसारखे अनेक पदार्थ देण्यात आले होते. अतिशय आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आलेल्या या पदार्थांचा प्रवाशांनी आस्वाद घेतला. इतकेच नाही तर अशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येणाऱ्या या बुफेमुळे उपस्थित सर्वच जण आनंदून गेले होते. या बुफेचा आस्वाद घेत सुरुवातीला अनोळखी असणाऱ्या या प्रवाशांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला.

प्रवाशांची अशापद्धतीने वेगळेपणाने काळजी घेणारी एअरलाईन्स कोणत्या प्रवाशांना नकोय? त्यामुळे ग्राहकांचा विश्वास कायम राखण्यासाठी एअरलाईन्सकडून करण्यात आलेली ही सरबराई ग्राहकांच्या पसंतीस न पडली तरच नवल.