एका महिलेने तिच्या ऑफिसमधल्या कामाच्या ताणाबाबत केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या महिलेने एक पोस्ट लिहिली आहे. मी सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत काम केलं. तरीही माझ्या बॉसची अपेक्षा आहे की मी नाईट शिफ्टही करावी. मला कळतच नाही मी काय केलं पाहिजे असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे. या महिलेची पोस्ट व्हायरल झाली असून तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

काय आहे या महिलेची पोस्ट?

मी काल सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत काम केलं. १४ तास काम केलं. मागचे काही आठवडे मी सुट्टीच्या दिवशीही काम करते आहे. असं असूनही माझ्या बॉसची अपेक्षा आहे की मी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी केलेल्या मेसेजला तातडीने रिप्लाय द्यावा. ही काम करायची नेमकी कुठली पद्धत आहे? मला काही समजतच नाही काय करावं असं म्हणत या महिलेने Reddit वर पोस्ट लिहिली आहे. मी पहाटे २.४५ ला झोपले होते. मी बॉसला उत्तर देऊ शकले नाही. त्यावरुन मला बॉसने खडे बोल सुनावले असंही या तरुणीने म्हटलं आहे.

१२ ते १४ तास काम करुनही मलाच ऐकवण्यात आलं

ही महिला पुढे म्हणाली मी याआधी याबाबत तक्रारी केल्या आहेत. पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. प्रत्येक वेळी मलाच ओरडा खावा लागला किंवा मलाच सुनावलं गेलं. मलाच सॉरी म्हणत दिलगिरी व्यक्त करावी लागली. मी १२ ते १४ तास करुनही ‘तू युजलेस’ आहेस हे ऐकून घेतलं. मी माझ्या बॉसच्याही बॉसकडे गेले. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि हो आपण काहीतरी करु म्हणत मान डोलवली. पुढे परिस्थिती जैसे थे. मी इथल्या कामाच्या पद्धतीला खूप त्रासले आहे. सतत डोक्यावर काळजीची तलवार असते असंही या महिला कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. एक काळ असाही होता की माझं काम मला आवडत होतं. आता मी पुरती कंटाळून गेले आहे. माझी काम करायला ना नाही. पण नोकरीच्या ठिकाणी असलेलं वातावरण असह्य करतं आहे. अशी पोस्ट या महिलेने लिहिली आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या महिलेला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हटलं आहे नेटकऱ्यांनी?

या महिलेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल जाल्यानंतर नेटकरी व्यक्त होत आहेत. एकाने म्हटलं आहे की तू अशी नोकरी कशाला करतेस ज्यात इतके टेन्शन्स आहेत, नोकरी सोड आणि दुसरी नोकरी शोध. दुसरा एक युजर म्हणतो ज्या ठिकाणी काम केल्याचं मानसिक समाधान मिळत नाही अशा जागी थांबायचं नाही पुढे जायचं. काहींनी तर असंही सांगतिलं आहे की या सगळ्या तक्रारी तू एचआरकडे मांड, महिला आयोगाला सांग. नक्की काहीतरी कारवाई होईल. एकाने या महिलेला असाही सल्ला दिला आहे की तू जी चूक केली नाही त्याबद्दल माफी मागू नकोस, सॉरी म्हणू नकोस. तसं वागत राहिलीस तर तुझ्याकडून अशीच अपेक्षा केली जाईल.