आपल्या आजूबाजूला काय चाललंय याच्याशी अनेकदा आपल्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याच आयुष्यात समस्यांचा एवढा डोंगर असतो, तिथे दुसऱ्यांच्या समस्या आपण कशा सोडवणार? अशी आपली स्थिती असते पण काही लोक असे आहेत ज्यांना दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यात समाधान वाटतं असतं. अशाच लोकांच्या गोष्टी जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ हे फेसबुक पेज. यावेळी त्यांनी नेपाळमधल्या एका छोट्या मुलीला नवं आयुष्य देणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याची सुंदर काहाणी यात मांडलीय.

काही वर्षांपूर्वी भूकंपाच्या तीव्र धक्क्याने नेपाळ हादरलं होतं. परिस्थिती इतकी भीषण होती की हजारो लोक यात मृत्युमुखी पडले होते. नेपाळला मदत करण्यासाठी जगभरातून सामाजिक कार्यकर्ते तिथे पोहोचले होते. यात मेहता नावाचा तरूणही होता. मदतकार्य करत असताना त्याला आठ वर्षांची एक छोटी मुलगी चिखलात खेळताना दिसली. एकीकडे भूकंपामुळे घरं जमीनदोस्त झाली होती, सगळीकडे भयानक वातावरण होतं अशातही ही मुलगी चिखलात शांतपणे खेळत होती. गावातले लोक तिला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते पण तिच्यासाठी मात्र ते नित्याचं झालं असल्यानं लोकांच्या तिरस्काराचा तिला काहीच फरक पडत नव्हता. लोकांनी हाकलल्यानंतर ती धावत मेहताकडे आली आणि त्याला मिठी मारून निघून गेली. तिच्याकडे पाहिल्यानंतर मेहताला लक्षात आलं की इतर मुलांसारखी नव्हती. ती गतिमंद होती आणि गावकऱ्यांसाठी ती फक्त चेष्टामस्करी करण्याचा विषय ठरली होती.

वाचा : म्हणून तो १२ वर्षांचा मुलगा भरपावसातही बुजवतोय रस्त्यावरचे खड्डे

जेव्हा मेहताने तिच्याबद्दल चौकशी केली तेव्हा तिच्याबद्दल त्याला आणखी एक गोष्ट समजली. तिची आई तिला सोडून पळून गेली होती. वडिल व्यसनी होते. काका तिचा सांभाळ करायचे, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला सांभाळायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. ती लहान असताना तिच्या डोक्याला इजा झाली होती. तिच्यावर योग्य ते उपचार न झाल्याने तिने आपली बोलण्याची शक्तीही गमावली होती. दुसरी दुर्दैवाची बाब अशी होती की तिला काही नावच नव्हतं. लोक वाट्टेल त्या नावानं तिला हाक मारायचे. तिच्यासाठी काहीतरी करण्याची मेहताला खूप इच्छा होती, पण त्यावेळी नियतीच्या मनात नव्हतं. नेपाळमध्ये मदत कार्य सुरू असताना पुन्हा एकदा दुसऱ्या भुकंपाच्या धक्क्याने नेपाळ हादरलं, मेहता यातून कसाबसा वाचला. चीनच्या सैन्याने त्याला वाचवलं, यानंतर मेहता मुंबईला परतला. पण तिच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

सगळं सुरळीत झाल्यानंतर त्याने तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिची माहिती मिळाली नाही. पण तिला शोधण्याचा प्रयत्न त्याने सोडला नाही. तो रोज फोन करून तिची चौकशी करत होता. दीड महिन्यानंतर मेहताला तिचा पत्ता सापडला. त्यानंतर काठमांडूमध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्याने तिच्या संगोपनाचा पूर्ण खर्च उचलला. गेल्या आठ वर्षांपासून लोकांची उपेक्षा सहन करत असलेली ती मुलगी मेहतामुळे आज चांगलं आयुष्य जगते आहे त्यानं ‘अनया’ असं तिचं नावही ठेवलं आहे.

Viral : मूर्ख चोरानं लपण्यासाठी जागाही भन्नाट शोधली बुवा !