Thar Car Accident in Delhi Showroom: नवी गाडी घेणं हे कोणत्याही मध्यम वर्गीय कुटुंबाचं स्वप्न असतं. गाडी घेताना कुटुंबाकडून पूजा-अर्चा केली जाते. नव्या गाडीच्या टायरखाली लिंबू ठेवून फोडलं जातं. नवीन गाडी आपल्यासाठी शुभ ठरावी, यासाठी प्रत्येकजण आपल्या श्रद्धांनुसार विधी करत असतो. मात्र दिल्लीत एका कुटुंबाला एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं. महिंद्रा कंपनीची जवळपास १५ लाख रुपये किंमतीची थार गाडी घेताना विचित्र अपघात घडला आणि नवीकोरी गाडी पहिल्या मजल्यावरून रस्त्यावर कोसळली. या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

सोमवारी दिल्लीच्या निर्माण विहार येथील महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये घडला. दरम्यान या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील मनी पवार (२९) अपघातात जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली.

सदर अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, प्रदीप आणि त्यांची पत्नी मनी पवार यांनी निर्मान विहार येथील शिव ऑटो कार महिंद्रा शोरूममधून थार रॉक्स ही गाडी विकत घेतली होती. पहिल्या मजल्यावर असलेल्या शोरूममध्ये ही गाडी पवार दाम्पत्याला सोपवली गेली.

पोलिसांनी पुढे सांगितले की, मनी पवार, पती प्रदीप आणि शोरूममधील कर्मचारी विकास हे थार गाडीत बसले होते. विकास गाडीचे फिचर्स त्यांना समजावून सांगत होता. गाडी विकत घेतल्यानंतर टायरखाली लिंबू फोडण्याचा विधी पार पाडणे बाकी होते. हा विधी करत असताना मनी पवार यांनी चुकून एक्सलेटर जोरात दाबला. ज्यामुळे गाडी पहिल्या मजल्यावरील काचेची भिंत फोडून थेट खाली कोसळली.

दरम्यान अपघातानंतर थार गाडी खाली उलटी पडली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडीत बसलेल्यांपैकी कुणालाही फार गंभीर दुखापत झालेली नाही, असे सांगितलं जात आहे. या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.