पैसा, संपत्तीसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. पैसा पाहून भल्याभल्यांची मती गुंग होते. यासाठी काही जण तर स्वत:चे आई-वडील, सख्ख्या भावा-बहिणीचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. तर मृत आई-वडील, नातेवाईकांची संपत्ती मिळवण्यासाठी खालची पातळी गाठताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार ब्राझीलमधून समोर आला आहे, ज्यात एक महिला तिच्या काकांच्या नावे कर्ज मिळण्यासाठी त्यांचा मृतदेह थेट बँकेत घेऊन पोहोचली. यानंतर तिने जे काही केले, ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. या महिलेचा तिच्या मृत काकांबरोबरचा बँकेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

महिलेने मृत काकांच्या हातात दिला पेन अन्….

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला एका वृद्ध पुरुषाला व्हीलचेअरवर बसवून कर्ज घेण्यासाठी बँकेत पोहोचली, पण तो वृद्ध पुरुष कोणताही हालचाल करत नव्हता. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार तो वृद्ध पुरुष दुसरा तिसरा कोणी नसूून त्या महिलेचे काका होते. धक्कादायक बाब म्हणजे ती मृत काकांना व्हीलचेअरवर बसवून बँकेत घेऊन आली होती, ती त्यांना जिवंत दाखवून कर्जाच्या कागदपत्रांवर सही घेऊन बँकेकडून कर्ज घेणार होती. ही महिला मृत काकांच्या हातात पेन देत त्यांच्याकडून कागदपत्रांवर सही करून घेण्याचा प्रयत्न करते. मात्र, वेळीच महिलेचे पितळ उघडं पडलं आणि यानंतर तिला अटक करण्यात आली.

दरम्यान, सुटकेनंतर महिलेने एका मुलाखतीत खुलेपणाने भाष्य केलं आहे. यावेळी तिने आपण कोणतीही चुकीची गोष्ट केली नसल्याचे सांगितले. यावर ती म्हणाली की, लोकांना वाटतं तशी मी काही राक्षस नाही. मेट्रोच्या अहवालानुसार, एका ब्राझील माध्यमांशी बोलताना महिलेने दावा केला की, मी बँकेत पोहोचली तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला असे मला समजले.

ब्राझीलमधील एका टीव्ही शोमध्ये महिलेने म्हटले की, आमच्या कुटुंबासाठी तो दिवस खूप भयानक होता. मला विश्वासच नव्हता की, माझ्या काकांचा मृत्यू झाला आहे. स्मरणशक्ती कमी असल्यामुळे घेत असलेल्या औषधांच्या परिणामांमुळे तिच्या हातून ही घटना घडल्याचे सांगितले. ती म्हणाली की, माझ्यावर उपचार सुरू आहेत. यात झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात घेतल्या. यात काकांनी मला कर्ज देण्यास मदत करेन असे सांगितले होते, त्यामुळे मी त्यांना बँकेत घेऊन आली.

क्षणात होत्याचं नव्हतं! भरधाव कारने एकाच वेळी उडवले चौघांना; अंगाचा थरकाप उडविणारा VIDEO

१६ दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर गेल्या आठवड्यात तिला सोडण्यात आले, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मृतदेहाची विटंबना केल्याचा आणि फसवणूक करून कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला आहे. पण, कोर्टाने तिची मानसिक स्थिती आणि अपंग मुलीप्रती असलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेत सुटका केली.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक बँक कर्मचारी महिलेला व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीबद्दल विचारतो. यावर ती महिला त्याला हे माझे काका आहेत असे म्हणते. महिलेचे म्हणणे आहे की, ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. ती महिला त्या व्यक्तीच्या नावावर ३४०० डॉलरचे कर्ज घेण्याचा प्रयत्न करते. मात्र, बँक कर्मचाऱ्यांना महिलेवर संशय आला, ज्यानंतर बँकेच्या एका कर्मचाऱ्याने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. नंतर असे निष्पन्न झाले की, ही महिला मृतदेह घेऊन बँकेत आली आणि बँकेची फसवणूक करत कर्ज काढणार होती. पण, त्याआधीच तिची पोलखोल झाली. काही वेळातच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.