आग्रा या ठिकाणी ताजमहाल आहे. हा ताजमहाल म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. ही वास्तू पाहण्यासाठी जगभरातले लोक येत असतात. याच आग्रा या ठिकाणी पती आणि पत्नीचं भांडण झालंय तेदेखील चक्क मोमोजवरुन. हे भांडण नुसतं झालं नाही तर पोलीस ठाण्यात पोहचलं. पत्नीने पतीकडे मोमोज खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण मोमोज खाऊ घातले नाहीत म्हणून दोघांमध्ये वाद झाला.

काय आहे हे प्रकरण?

ज्या पती-पत्नीचं भांडण झालं त्यांचं लग्न सहा महिन्यांपूर्वी झालं आहे. पतीने पत्नीला वचन दिलं होतं की आठवड्यातून दोनदा तो पत्नीला मोमोज खायला घेऊन जाईल. मात्र लग्नानंतर पतीने वचन पाळलं नाही. यावरुन दोघांमध्ये भांडण होऊ लागलं. लग्नानंतर पतीने वचन पूर्ण केलं नाही त्यामुळे दोघांमधले वाद इतके वाढले की पत्नीने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांना या महिलेने सांगितलं की मला मोमोज प्रचंड आवडतात, रोज खायला दिले तरीही मी खाऊ शकते. मात्र पती मोमोज खायला नेत नाही. पत्नीने पतीविरोधात ही तक्रार केली.

हे पण वाचा- “अशा मोमोपेक्षा विष चांगलं…” असे का म्हणत आहेत नेटकरी? व्हायरल होणारा ‘हा’ Video पाहा…

मोमो खाण्यावरुन महाभारतच

मोमो खाण्याच्या पत्नीच्या आवडीवरुन या दोघांमध्ये वाद होत होते. आपला पती आठवड्यातून दोनदाही मोमो खायला नेत नाही. त्याने लग्नापूर्वी आश्वासन दिलं होतं पण ते तो पाळत नाही असं या महिलेने पोलिसांना सांगितलं. दोघांमध्ये भांडण आणि वाद इतके वाढले की ही महिला माहेरीही गेली होती. तिथेच राहू लागली होती. आता या सगळ्या प्रकारानंतर पतीने हे आश्वासन दिलं आहे की कामावरुन येताना उशीर होतो म्हणून मी मोमोज आणू शकलो नाही तसंच कधी कधी लक्षात राहात नाही. मात्र यापुढे मोमोज आणायचं वचन पतीने दिलं आहे. त्यानंतर या दोघांमधला वाद मिटला आहे.

आग्रा येथील मलपुरा भागात हे प्रकरण घडलं आहे. पोलिसांनी या दोघांना समुपदेशकांकडे पाठवलं आणि समुपदेशकांनी या प्रकरणी दोघांची समजूत घातली. त्यानंतर या दोघांमधला वाद मिटला आहे. पत्नीला आठवड्यातून दोनवेळा मोमोज खाऊ घालेन असं आश्वासन आता पतीने पत्नीला दिलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.