भारत मातेच्या संरक्षणासाठी जवान आपल्या प्राणाची बाजी लावायलाही मागे पुढे पाहात नाही. मग सियाचीनसारखा ऋण अंश सेल्सिअस तापमानात २४ तास गस्त घालणं असो की रणरणत्या उन्हात, पावसात काही न खाता पिता काम करणं असो, कठीणातल्या कठीण परिस्थितीत मातृभूमीच्या संरक्षणासाठी जवान सदैव झटत असतात. कोणतीही अडचण त्यांना आपल्या कर्तव्यापासून लक्ष विचलित करू शकत नाही आणि हे दाखवून देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवतीच्या वर्णभेदी वागण्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका 

गुडघाभर पाण्यातही बीएसएफचा एक जवान सीमेवर गस्त घालत होता. पूरामुळे पूर्ण गाव सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. दूरदूरपर्यंत पुराचं पाणी साचलं होतं तरीही गुडघाभर पाण्यात उभं राहून हा जवान आपलं कर्तव्य बजावत होता. लोंगाई नदी परिसरातला हा फोटो आहे. या भागात बांगलादेशची सीमा आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ब्रम्हपुत्रा नदीला पूर आला होता. तेव्हा आजूबाजूच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यात १० जणांचा मृत्यूही झाला होता. आजूबाजूची परिस्थिती हलाखीची असतानाही या जवानाने आपली कर्तव्यनिष्ठा सोडली नाही.

वाचा : ‘त्याने’ दिला एका मुलीला जन्म

BSF या ट्विटवर पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या फोटोला ३ हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलंय. तेव्हा कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या या जवानाला नेटिझन्स सलाम करत आहेत.