Shocking video: सापाविषयी आजही समाजात बरेच गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. साप म्हणजे मरण ही कल्पना लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की, साप म्हणताच अनेकांना धडकी भरते. सापाविषयी अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये अंधश्रद्धेने एका तरुणाचा जीव घेतलाय. यूपीच्या बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सर्पदंशामुळे मरण पावलेल्या तरुणाला जिवंत करण्याच्या आशेने त्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह दोरीने बांधून गंगेच्या पाण्यात लटकवला. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील जयरामपूर कुडेण्या गावातील रहिवासी मोहित कुमार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शेतात काम करत असताना २६ एप्रिल रोजी त्याला साप चावला. यानंतर तो तातडीनं डॉक्टरांकडे गेला मात्र उपचार घेतल्यानंतरही त्याची त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, तेव्हा त्याच्या कुटुंबाने स्थानिक उपचार करणाऱ्या व्यक्तीची मदत घेतली. यानंतर, त्यांनी मोहितचा मृतदेह गंगा नदीत दोन दिवस लटकवून ठेवला, जेणेकरून ते विष पाण्याबरोबर शरीरातून निघून जाईल. गंगेच्या पाण्यात मृतदेह ठेवल्यास सापाच्या विषाचा प्रभाव नाहीसा होऊन मृत तरुण जिवंत होऊ शकतो, या आशेने त्यांनी मोहितचा मृतदेह दोरीने बांधून गंगेत लटकला. दोन दिवस हे शरीर पाण्यात राहिले मात्र मोहित जिवंत झाला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार केले. अंधश्रद्धेच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: अरुंद गल्ली, पाठून आला अन् थेट धाडधाड गोळ्या घातल्या; प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची थरारक हत्या

अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी हरिद्वारमध्ये घडली होती. यामध्ये एका आईनं पोटच्या चिमुकल्याला गंगा नदीत बराच वेळ बुडवून ठेवलं. यात मुलाचा आजार बरा होईल, असं मुलाच्या आई-वडिलांना वाटत होतं. पण पाण्यात बराच काळ राहिल्यामुळे या मुलाचा दुर्दैवी अंत झाला.