सध्या सणासुदीच्या काळात किंवा इतर कोणत्याही प्रसंगात अनेक तरुण-तरुणी फोटो, रील्स शेअर करताना दिसतात. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा नेमका याच कारणासाठी हवा असतो. पण, ज्यांच्याकडे ही गर्दी नाही त्यांचं काय… याचं उत्तर म्हणजे हा नवीन ट्रेंड आहे. तुम्हाला जर सणासुदीच्या काळात किंवा कुठेतरी बाहेर जाण्यासाठी एखाद्या मित्राची गरज असेल, तर तुम्ही तो भाड्यानं घेऊ शकता. सणासुदीच्या काळात छान तयार होऊन बाहेर जाणं, फोटो काढणं, तुमच्या विनोदांवर हसणं या सगळ्यासाठी मित्र खरेदी करता येऊ शकतात. ‘रेडिट’वर सध्या या ट्रेंडबद्दल चर्चा सुरू असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
खरंच मैत्री की…
इंन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून लोकांसमोर दिसणं याला सध्या एक वेगळंच महत्त्व निर्माण झालं आहे. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जात आहात, काहीतरी नवीन डिश खात आहात किंवा सेलिब्रेट करीत आहात या सर्व गोष्टींसाठी मित्र-मैत्रिणी आवश्यक असतातच. अशा वेळी ज्यांच्याकडे ते नाहीत, त्यांचं काय… तर सध्या एक ट्रेंड व्हायरल होत आहे आणि तो म्हणजे मित्र भाड्यानं घेणं आणि तोही फोटो, फिरणं आणि आपल्या मनाप्रमाणे वागण्यासाठी.
भाड्यानं घेतलेला मित्र हा एका अशा परिस्थितीचा भाग असतो की, जिथे तुम्ही कधीही एकटे नसता, दुर्लक्षित नसता आणि कायम उत्साही अशा सामाजिक घडामोडींचा भाग असता.
कोण असेल हा मित्र?
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हा भाड्यानें घेतलेला मित्र म्हणजे तुमचा कॉलेज मित्र, ऑफिसमधला कर्मचारी किंवा अगदी बिझनेस पार्टनरही असू शकतो. ते फक्त गप्पा मारण्यासाठी नसतात, तर ते प्रत्यक्षात सादरीकरण करत असतात. मग या सादरीकरणाच्या बदल्यात त्यांना काय मिळेल? काही रेडिट वापरकर्त्यांच्या मते, एका तासासाठी मित्र असण्याचं शुल्क तीन हजार वगैरे असेल. म्हणजे साधारण ५ तासांसाठी बाहेर जायचं असेल तर ३००० रुपये मिळतात.
किंमत का मोजली जाते?
या विचित्र ट्रेंडमागे एक आर्थिक बाबही आहे. कार्यक्रम, समोरचं व्यक्तिमत्त्व यावर अवलंबून असलेले दर वाढवलेही जाऊ शकतात. सोशल मीडियावर याबाबात बरीच चर्चा होत आहे. खरा मित्र नसणं हा अपराध आहे का किंवा मित्रांच्या समस्यांशी प्रत्यक्षपणे जोडला न जाणारा मित्र कसा, असे प्रश्न काही जण याबाबत उपस्थित करीत आहेत. मात्र, इथे एक गोष्ट आहे ती म्हणजे लोक मैत्रीसाठी नाही, तर तो सामाजिकदृष्ट्या एकटा नाही हे दाखविण्यासाठी पैसे देत आहेत. व्यक्तिमत्त्व आणि सहवास याला आपण किती महत्त्व देतो याचा हा पुरावा आहे, मग त्या बाबी बनावट का असेनात.
एकटेपणाची जाणीव
एकटेपणा दिसू नये म्हणून लोक मित्र भाड्याने घेत आहेत. असेही दिसून येते की, भावनिक परिस्थितीला लोक जास्त महत्त्व देत, त्यात आर्थिक गुंतवणूक करीत आहेत; मग ते तात्पुरते का असेनात. पण दुसरीकडे, हा ट्रेंड असंही दर्शवतो की, आपण फक्त स्वत:बाबत विचार करतो आणि स्वत:साठी प्रसंगी कितीही पैसे देण्यास तयार असतो.
सत्य परिस्थितीला सामोरं जाणं अवघड आहे का?
जगात एका बाजूला एकटं राहून स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो आणि दुसरीकडे खोलवर गेलेला एकाकीपणा इतक्या जास्त प्रमाणात जाणवू लागलेला असतो की, त्यासाठी आता मित्रदेखील भाड्याने घ्यावे लागत असतात. याचाच अर्थ आपण आता मैत्रीदेखील आउटसोर्स करीत आहोत.