Viral Video Today: मरीन ड्राइव्ह ही नुसती जागा नसून मुंबईकरांसाठी किंवा बाहेरूनही मुंबईत येणाऱ्या प्रत्येकासाठी एक सुखाची व्याख्या आहे. एखादी निवांत संध्याकाळ, मित्रांसह मजा मस्ती, युट्युबचे प्रॅन्क, रविवारी सकाळी जॅमिंग सेशन, व्यायाम आणि अगदीच काही नाहीतर समुद्रासमोर बसून स्वतःसह घालवलेला वेळ हे सगळं काही या एकाच जागेत सामावलेलं आहे. मरीन्स येथील असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

आयुष्य जगत असताना विविध गोष्टींच्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो. आजवर अनेकांनी गाणी- नृत्य व एकूणच कला हा व्यक्त होण्याचा सुंदर मार्ग असल्याचे अनेकदा म्हटले आहे. या व्हिडिओतील एक व्यक्ती सुद्धा मरिन ड्राइव्हला येऊन रोजच्या जीवनातील टेन्शन-दुःख बाजूला सारून बेभान होऊन नाचताना दिसत आहे. या काकांच्या मूव्हज व त्यापेक्षाही त्यांचा आनंद व आत्मविश्वास पाहून अनेकजण भारावून गेले आहेत. हा डान्स पाहून आम्हीही आमचे दुःख विसरलो असेही काही जण म्हणत आहेत.

मरीन ड्राइव्ह येथे ‘लत लग गई’ ह्या गाण्यावर बेभान होऊन डान्स करणारे हे काका स्वतःसह इतरांनाही आपल्या उत्साहाने भारावून टाकतात आणि आपल्या आनंदात समाविष्ट करून घेत आहेत.

हे ही वाचा<< १५ दिवसांनी लाडूबाईचे बाबा घरी आले आणि…चिमुकलीचे डोळे पाहून म्हणाल, “लेक खरंच लक्ष्मी”

फ्लटर शटर नावाच्या इंस्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर करत “आयुष्य जगायला बस एवढ्याच आत्मविश्वासाची गरज आहे” असे वाक्य व्हिडीओ मध्ये लिहले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ मिलियन व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओतील व्यक्ती ही CA असून अभिजित शहा असे त्यांचे नाव आहे ज्यांचे अनेकांनी तोंड भरून कौतुक केले आहे.