देशभर सध्या शारदीय नवरात्रीची धुम आहे. ओडीशामध्ये नवरात्रीच्या दिवसात एक वेगळाच योग जुळून आलाय. एका गाईने दोन डोके आणि तीन डोळे असलेल्या वासराला जन्म दिलाय. ही दुर्मिळ घटना ओडीशामधल्या नबरंगपुर गावात घडलीय. या आश्चर्यकारक घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ऐन नवरात्रौत्सवात या विचित्र रूपातील वासराचा जन्म झाल्याने त्याला दुर्गा मातेचे रूप मानून त्याची पूजा देखील करण्यात येतीय. शारीरिक व्यंग असलेल्या विचित्र वासराचा जन्म झाल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीये.

ऐकावे ते नवलच या उक्ती प्रमाणे अहो आश्चर्यम,असं म्हणत हा निसर्गाचा अदभूत असामान्य चमत्कार असल्याची चर्चा ओडीशामध्ये सुरूय. गाईने जन्म दिलेले हे वासरू पाहून घरचेही आश्चर्यचकित झाले आहेत. शरीर सामान्य मात्र दोन डोके आणि तीन डोळे पाहून घरचे हैराण झाले आहेत. कुमुली पंचायत च्या बीजापुर गावातील शेतकरी धनीराम यांच्या घरी गाईने या असामान्य वासराला जन्म दिलाय. दोन वर्षांपूर्वी शेतकरी धनीराम यांनी ही गाय खरेदी केली होती. या गाईला प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या, त्यावेळी वासराला जन्म देताना भरपूर अडचणी देखील आल्या होत्या.

या असामान्य वासराला पाहण्यासाठी सुरूवातीला गावकऱ्यांनी धनीराम यांच्या घरच्या दिशेने धाव घेतली. गावभर ही चर्चा रंगली. त्यानंतर या गाईचा आणि तिच्या असामान्य वासराचा व्हिडीओ गावकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. नागरिकांच्या मते या गावात अशी घटना कधीच घडली नाही. सध्या हे वासरू संपूर्ण गावाच्या कुतूहलाचा विषय बनलाय.

p_yadav नावाच्या युट्यूब चॅनलवरून या असामान्य वासरू आणि गायीचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. शेतकरी धनीराम यांच्या मुलाने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, सध्या या वासराला गाईचं दूध पिण्यासाठी दोन तोंडामुळे अडचणी येत आहेत. त्यामूळे सध्या या वासराला बाहेरून दूध पाजावं लागत आहे. नवरात्रीच्या पवित्र दिवसात घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडेच चर्चा होत आहे. या वासराला दुर्गा मातेचं रूप मानून त्याची पूजा ही करण्यात येतेय. या वासराचं तोंड दक्षिण दिशेला ठेवत त्याची पूजा करण्यात येतेय. कारण त्यांच्यासाठी दक्षिण दिशा ही शुभ मानली जाते.