Reddit Post Of Young Lady: एका २७ वर्षीय तरुणीने तिच्या भावनिक आणि आर्थिक थकव्याबद्दल व्यक्त केलेली रेडिट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे हजारो तरुण नोकरदार भावनिकदृष्ट्या प्रभावित झाले आहेत, जे तुलनेने जास्त उत्पन्न असूनही, असेच विविध जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेले वाटत आहेत.
दरमहा १.७ लाख रुपये कमावणाऱ्या या तरुणीने ईएमआय, बचत उद्दिष्टे आणि कुटुंबाच्या अपेक्षांचे तिला किती ओझे वाटते, हे पोस्टमध्ये सांगितले आहे. या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिची काहीच बचत होत नाही, असेही तिने नमूद केले आहे.
या तरुणीने तिच्या पोस्टमध्ये संयम आणि कर्तव्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. यामध्ये तिने स्पष्ट केले आहे की, तुटलेला फोन बदलण्यासाठीदेखील तिला सहा महिन्यांहून अधिक काळ विचार करावा लागतो. “मला असे वाटते की मी माझ्या बचतीची फसवणूक करत आहे आणि जर काही चूक झाली, तर काय परिणाम होतील?”
पुढील चार महिने…
स्थिर उत्पन्न असूनही, त्यातील बरेच भाग निश्चित कारणांसाठी जातात. यामध्ये ३०,००० रुपये शैक्षणिक कर्जाचा ईएमआय, ५०,००० ते ६०,००० रुपये एसआयपी, २०,००० रुपये ऑफिसच्या प्रवासासाठी, ५,००० रुपये मोलकरणीसाठी आणि ५,००० रुपये वैयक्तिक खेळ किंवा इतर गोष्टींसाठी जातात. याशिवाय, पुढील चार महिने तिच्या आईला मागील शैक्षणिक मदतीसाठी दरमहा २०,००० रुपये द्यायचे आहेत.
संपूर्ण दिवस काम करून, स्वतःवरही खर्च…
तरुणीने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “मी बाहेर जेवायला किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्यासाठी, किंवा स्विगी ऑर्डर करण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. मी दरवेळी २०० रुपयांमध्ये काहीतरी स्वस्त ऑर्डर करण्याचा प्रयत्न करते. मला हे जगणे आवडत नाही, जिथे मी संपूर्ण दिवस काम करून स्वतःवरही खर्च करू शकत नाही. काय करावे हे मला कळत नाही आणि मला खूप निराशा वाटत आहे.”
सोशल मीडियावर चर्चा
या तरुणीची पोस्ट अनेकांना भावली, ज्यात एका युजरने स्वतःच्या अनुभवाचा संदर्भ दिला. “ऑफिसला जाण्याचा २० हजार रुपयांचा खर्च वगळता, तुम्ही चांगल्या गोष्टींवरच खर्च करत आहात, असे दिसते. मी ते शैक्षणिक कर्ज लवकरात लवकर फेडण्याची आणि आपत्कालीन निधी उभारण्याची शिफारस करेन. कर्ज फेडणे खरोखरच छान वाटते.”