Viral Video: व्लॉगिंग करणं हा आता अनेकांचा छंद झाला आहे. फूड व्लॉगिंग त्यातला लोकप्रिय प्रकार आहे. रेस्टॉरंट किंवा चविष्ट खाद्य असलेल्या ठिकाणांवर तिथल्या अन्नावर ताव मारायचा आणि त्याची माहिती आपल्या फॉलोअर्सना द्यायची, ही पद्धत जगभरात रूढ झालेली आहे. टेक्सासमध्ये दोन इन्फ्लूएन्सर अशाच प्रकारे फूड व्लॉगिंग करत असताना एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
युट्यूबर आणि फूड इन्फ्लूएन्सर नीना सॅंटियागो आणि तिचा सहकारी कंटेंट क्रिएटर पॅट्रिक ब्लॅकवुड हे टेक्सासमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसले होते. नीना आणि पॅट्रिकने बर्गरची माहिती देऊन त्याचा पहिला घास तोंडात टाकला आणि तेवढ्यात एक एसयूव्ही येऊन त्यांच्या बाजूच्या भिंतीला आदळली.
नीना आणि पॅट्रिक खिडकीजवळच बसले होते. त्यामुळे गाडीची जोरदार धडक बसताच ते टेबलावरून काहीसे बाजूला फेकले गेले. खिडकीच्या काचा त्यांच्या अंगावर पडल्या आणि यात दोघेही जखमी झाले.
हा धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नीना सॅंटियागो हीच्या नीना अनरेटेड या इन्टाग्राम हँडलवर सदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच इतर सोशल मीडिया साईटवरही व्हिडीओ शेअर होताना दिसत आहे.
सदर अपघाताची माहिती देत असताना नीनाने सांगितले की, ह्युस्टन येथील एका हॉटेलमध्ये मी आणि पॅट्रिक जेवण करत होतो. त्यावेळी एक एसयुव्ही कार येऊन आमच्या भिंतीवर आदळली. आम्ही या अपघातातून बचावलो, याबद्दल देवाचे आभार मानतो. नीनाने या व्हिडीओसह काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यात तिच्या आणि पॅट्रिकच्या चेहऱ्याला जखम झालेली दिसत आहे.
नीनाने पुढे म्हटले की, मी एका स्वादिष्ट सॅल्मन स्लायडरचा एक घास घेतला आणि आमच्या उजव्या बाजूला एसयूव्ही कार येऊन धडकली. जोरात आवाज होऊन खिडकीच्या काचा तुटल्या. तेवढ्यात आम्ही टेबलावरून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. या अपघातानंतर हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी लगेचच आमची मदत केली, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.