नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या अनेकांना आपले आयुष्य संपवावेसे वाटते. अशावेळी नेहमीच देवदूतासारखा तो धावून येतो आणि आत्महत्या करणा-या प्रत्येकाला तो जगण्याची नवी उमेद देतो. म्हणूनच ‘एन्जल ऑफ नानजिंग’ या नावाने तो जगभर ओळखला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : मरणासन्न अवस्थेत असलेल्या कुपोषित बालकाला ‘तिने’ दिले जीवनदान

चीनमधल्या नानजिंग नदीवर असणारा नानजिंग पूल हा ‘आत्महत्येचा पूल’ म्हणून कुप्रसिद्ध आहे. प्रेमी युगुलापासून ते नैराश्येचा गर्तेत सापडलेले अनेक जण या पुलावरच येऊन आत्महत्या करतात. या पुलाने आपले आयुष्य संपवताना अनेकांना  पाहिले आहे. काहींना सुदैवाने वाचवण्यात यशही आले. या पुलावरुन जाणा-या प्रवाशांनी अनेकांना आत्महत्या करताना पाहिले आहे. म्हणूनच, अशांसाठी ‘चेन शी’ हे काम करतात. गेल्या १३ वर्षांपासून ते स्वत:हून या पूलावर गस्त घालत आहेत. आत्महत्या करण्यापासून त्यांनी आतापर्यंत ३०० लोकांना परावृत्त केले आहे.

चेन शी यांना ‘एन्जल ऑफ नानजिंग’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्यावर एक माहितीपट देखील बनवण्यात आला होता. सुट्टीच्या दिवसात सकाळी ७ वाजल्यापासून स्कूटरवरून किंवा पायी चालत ते या पूलावरुन गस्त घालतात. आत्महत्या करताना  कोणी दिसले तर त्यांना समजावतात आणि आत्महत्या करण्यापासून परावृत्त करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एका इसमाने हल्ला देखील केला होता. पण चेन यांनी हे काम थांबवले नाही. ‘ नैराश्येत सापडलेल्या माणसांना बाहेर आणणे खूप कठीण काम असल्याचे ते सांगतात. माणसे मदत नाकारतात किंवा माझ्यावर ओरडतात. पण, मी माझे काम कधीच सोडत नाही.’ असेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. चेन शी यांनी पुलावर अनेक ठिकाणी आपला मोबाईल नंबर लिहून ठेवला आहे. जर कोणाला गरज लागली तर चेन लगेच मदतीला धावून येतात.

इतकेच नाही तर वाचवलेल्या माणासांसाठी त्यांनी एक घरही बांधले आहे. यात अशी माणसं काही दिवस राहू शकतात. तसेच त्यांना नैराशातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदतही चेन देऊ करतात. ‘आयुष्य खूप सुंदर असते आणि चुकीचा मार्ग निवडून ते संपवण्याचा प्रयत्न कोणी करु नका’ अशी विनंती हा देवदूत नेहमीच या पुलावर येणा-या माणसाला करतो. त्यांचा प्रवास सांगणारी गोष्ट ‘नाऊ धिस’ या फेसबुक पेजने फेसबुकवर शेअर केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chen si stopped over 300 people from throwing themselves off nanjing bridge
First published on: 30-11-2016 at 12:30 IST