करोना विषाणूनं देशात थैमान घातलं असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दुसरीकडे संशोधक करोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. पण काही ठिकाणी या विषाणूवर स्वत:चं औषधं वापरलं जातेय. मुलांना देशी दारु पाजल्याचा ओदिशामधील एक व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून या मुलांना दारु पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, पारसनपाली येथील आदिवासी भागातील लोकं नशेसाठी या दारूचा वापर करतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या दारुत काही औषधी गुणही आहेत. ओदिशा न्यूजने मुलांना पाजण्यात आलेल्या दारुचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मुलांना एका पंगतीत खाली बसून ग्लासात दारू दिली जात असल्याचे दिसत आहे.

ओदिशामधील पारसनपाली या गावात एका लग्न कार्यक्रमात दहा ते १२ वर्षांच्या मुलांना देशी दारु पाजण्यात आली आहे. ही दारु सालापाच्या झाडापासून तयार करतात. येथील आदीवासी लोक दररोज या दारुचं प्राशन करतात मात्र, करोना होऊ नये म्हणून दहा-बारा वयाच्या मुलांनाही ही दारु पाजली. या सर्व घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन लोकांना कोरोनाबाबत माहिती देत नसल्याचे समोर आले आहे.