सोशल मीडियावर रोजच नवनवे विषय या ना त्या कारणाने चर्चेत असतात. यापूर्वी ओरिओ भजी आणि रसगुल्ला चाटबाबत जोरदार चर्चा रंगली होती. आता सोशल मीडियावर ‘जन्नत मिरची आइसक्रिम रोल’ धुमाकूल घालत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत. ही क्लिप इंदौरचा फूड व्लॉगर रिषभ सिंह याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा व्हिडिओ युट्यूब चॅनेल स्पून ऑफ इंदौर 2.0 वर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांना हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच हजारो लोकांनी लाईक्स करत शेअर केला आहे.

व्हिडिओ मिरची आइसक्रिम रोल बनवणाऱ्या स्ट्रीट फूड वेंडरचा आहे. हा व्हिडिओ पाहताना अनेकांना आश्चर्य वाटते की, खरंच मिरचीपासून आइसक्रिम बनू शकतं का? मात्र हे खरं आहे. इंदौरच्या रस्त्यावर काही फूड वेंडर आपल्या स्टॉलवर मिरची आणि आणखी काही गोष्टींपासून आइसक्रिम बनवताना दिसतील. या व्हिडिओत दुकानदार मिरचीचे छोटे तुकडे करतो. त्यानंतर मिरची, मिल्क क्रिम आणि चॉकलेट पसरवून एकत्र करतो. त्यानंतर या तिन्ही गोष्टींचं चांगल्या प्रकारे मिश्रण करतो. योग्य प्रकारे मिश्रण झाल्यानंतर त्याचे रोल करून आइसक्रिम प्लेटमध्ये देताना त्यावर मिरचीसह गार्निश करतो.

व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्श मजेशीर कमेंट्स करत आहे. “आम्हाला भारतीय खाद्य दुरुपयोग नियंत्रण ब्युरोची गंभीरतेने आवश्यकता आहे”, असं एका नेटकऱ्याने लिहीलं आहे. “तर मिरचीचा तिखटपणा राहणार नाही.”, असं दुसऱ्या युजर्सने लिहीलं आहे. मॅगी मिल्कशेकपासून ओरिओ भजी आणि मिरची आइसक्रिमपर्यंत विचित्र खाद्यपदार्थांची मेजवानी यंदा लोकांना मिळाली.