अनेक वॉटर पार्कमध्ये वेव्ह पूल हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं. या पूलमध्ये येणाऱ्या मोठमोठ्या लाटांमध्ये अनेकजण भिजण्याचा आनंद घेत असतात. केवळ आनंद लुटण्यासाठी अनेकजण या वेव्ह पूलमध्ये उतरतात. पण अनेकदा दुर्घटना होऊन पर्यटक जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत ४४ जण जखमी झाले आहेत. हा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मंचुरिया येथील शुईयून वॉटर पार्कमध्ये ही दुर्घटना घडली आहे. वॉटर पार्कमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाण्याची मोठी लाट उसळली. अचानक आलेल्या या मोठ्या लाटेमुळे वेव्ह पूलमधील ४४ जण जखमी झाले आहेत.

एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. १० सेकंदाच्या या व्हिडीओत त्सुनामी आल्याप्रमाणे लाट येताना दिसत आहे. लाट इतकी मोठी होती की, काहीजण अक्षरक्ष: पुलाच्या बाहेर फेकले गेले. असोसिएट प्रेसला दिलेल्या मुलाखतीत, वॉटर पार्कच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना झाल्याचं म्हटलं आहे. याआधी राईड ऑपरेटर नशेत होता असं वृत्त होतं. मात्र हे वृत्त फेटाळून लावण्यात आलं. दरम्यान सध्या वॉटर पार्क बंद करण्यात आलं असून तपास करण्यात येत आहे.