आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचं आडनाव त्या व्यक्तीची एकप्रकारे ओळख मानली जाते. पण, आसाममध्ये एका महिलेसाठी तिचं आडनाव चांगलंच डोकेदुखी ठरलंय. यामुळे तिचा नोकरीचा अर्जही नाकारण्यात आल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेचं नाव प्रियंका असून ती गुवाहाटीची रहिवासी आहे. प्रियंका ‘नेशल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड’ या सरकारी कंपनीत नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न करत होती. पण, आडनाव Chutia असल्याने वेबसाइट आणि सॉफ्टवेअरकडून तिचा अर्ज वारंवार रिजेक्ट केला जात होता. प्रियंकाने अनेकदा प्रयत्न केले पण सॉफ्टवेअर तिचं आडनाव रिजेक्ट करुन ‘योग्य शब्दाचा वापर करावा’ असा एरर दाखवत होतं. अखेर प्रियंकाने याबाबत फेसबुकवर संताप व्यक्त केला.

“नेशल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडसारखी मोठी सरकारी कंपनी वारंवार माझा नोकरीचा अर्ज वारंवार नाकारतेय आणि कारण काय तर माझं आडनाव. मला वाईट वाटतंय आणि सगळ्यांना सांगून मी आता थकलेय की माझं आडनाव कोणता अपशब्द नाहीये…तर तो आमच्याकडे समाज आहे”, अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली. यासोबतच प्रियंकाने आपल्या समाजातील लोकांना सोशल मीडियावर नको त्या विषयांवर बोलण्यापेक्षा या मुद्द्याला वाचा फोडण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, प्रियंकाने NSCL ला सविस्तर ई-मेल पाठवून सॉफ्टवेअरकडून आडनावामुळे अर्ज रिजेक्ट होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तिचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.  सॉफ्टवेअरचे कोडिंग आपोआप काही अपशब्द फिल्टर करतात, त्यामुळे प्रियंकाचा अर्ज स्वीकारला जात नव्हता, असे NSCL कडून सांगण्यात आले. प्रियंकाच्या पोस्टनुसार, आसाममध्ये Chutia नावाचा समाज आहे. ज्याचा उच्चार सुतिया असा होतो. यापूर्वी All Assam Chutia Students’(AACSU)या विद्यार्थी संघटनेनेही फेसबुकवर आडनावामुळे हजारो लोकांचं अकाउंट ब्लॉक केल्याचा आरोप केला होता.

 

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chutia not slang but assamese surname says assam woman whose job application was rejected due to surname sas
First published on: 23-07-2020 at 08:45 IST