सगळ्यांच्या आयुष्यात कॉलेज लाईफ (College Life) ही बाब खूप खास मानली जाते. मित्र-मैत्रिणींसोबत कॉलेजच्या कँटीनमध्ये बसून आवडीचे पदार्थ खाणे, रोजची ठरलेली जागा म्हणजेच कॉलेज कट्ट्यावर भेटणे, एकत्र लेक्चरला जाणे आदी अनेक गोष्टी आपण सगळ्यांनीच कॉलेजमध्ये अनुभवल्या असतील. यादरम्यान, अनेक सोशल मीडिया ॲपवर तासन् तास एकमेकांशी संवाद साधणे, रील स्क्रोल करणे, चित्रपट किंवा एखादी सीरिज बघणे या सगळ्यात अनेक तरुण मंडळी रात्रभर चादरीच्या आतमध्ये मोबाईल ठेवून जागी असतात आणि सकाळ झाली की, झोपी जातात. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. आयएफएस (IFS) अधिकाऱ्यांनी शेतातील एका प्राण्याची तुलना या कॉलेजच्या तरुण मंडळींसोबत केली आहे.
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेतातील आहे. रात्री १ वाजता आयएफएस अधिकारी आणि त्यांच्या टीमला शेतात एक हत्ती दिसला. या हत्तीला सुखरूप जंगलात पोहोचवण्यासाठी त्याला रस्ता दाखवण्यास मदत करण्यात आली. शेतात टॉर्चच्या मदतीने प्रकाश पाडून, त्याच्या प्रकाशात हत्तीचा एक खास फोटो काढण्यात आला. तसेच या फोटोची तुलना आयएफएस अधिकाऱ्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत केली आहे आणि एक खास कॅप्शन लिहिली आहे. आयएफएस अधिकाऱ्यांनी नक्की कशा प्रकारे हत्तीची कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत तुलना केली एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघाच…
हेही वाचा…‘यूट्यूबर्सना प्रवेश नाही!’ प्रसिद्ध नवरात्र उत्सव मंडळाचा मोठा निर्णय…
पोस्ट नक्की बघा :
हत्तीची केली कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत तुलना :
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा फोटो शेअर करून म्हटलंय- शेतात फिरणारा एकटा हत्ती कॉलेजच्या त्या प्रत्येक विद्यार्थ्यासारखा आहे; जे सूर्य उगवल्यावर झोपतात व संध्याकाळी उठतात आणि रात्रभर इकडे-तिकडे फिरत राहतात. काल रात्री १ वाजता आमच्या टीमने या हत्तीचा पाठलाग केला आणि त्याला सुरक्षितपणे जंगलात जाण्यासाठी मार्गदर्शन केले; असा संदेश देऊन या फोटोला खास बनवले आहे. आयएफएस अधिकाऱ्यांनी रात्री जंगलात एकट्या फिरणाऱ्या हत्तीची कॉलेजच्या मुलांसोबत अगदी चोख अशी तुलना केली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @parveenkaswan यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. आएफएस अधिकाऱ्यांची खास कॅप्शन पाहून ‘उत्तम उदाहरण’ दिले आहे, असे एक युजर म्हणत आहे. तर हत्तीची कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत केलेली तुलना अनेकांना आवडली आहे, असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. तसेच कॉलेजचे काही विद्यार्थीसुद्धा या कॅप्शनशी सहमत आहेत, असे ते कमेंटमधून सांगताना दिसत आहेत.