करोना विषाणूमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता ११० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. चीनमध्ये डिसेंबर महिन्यापासून करोनाविरुद्ध युद्धपातळीवर काम सुरु आहे. येथे लाखो लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले होते. दोन ते तीन महिन्यांच्या लढ्यानंतर चीनमध्ये करोनाचा प्रादूर्भाव कमी होताना दिसत आहे. येथील कार्यालये आता हळूहळू सुरु होत आहे. मात्र ऑफिस सुरु होऊन काही दिवस झाल्यानंतर ऑफिसला जाण्याचा कंटाळा आल्याने एका व्यक्तीने आपल्याला करोना झाल्याचे कळवले. त्यानंतर ऑफिसने तातडीने तीन दिवसांसाठी ऑफिसची इमारत बंद करण्याचा निर्णय घेत सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आदेश दिले.
या कर्मचाऱ्याकडे तुला करोनाचा लागण कशी झाली यासंदर्भात सरकारी यंत्रणांनी आणि पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्याने एका मॉलमध्ये आपल्याला लागण झाल्याचे स्पष्ट केलं. मी ज्या सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी गेलो होतो तिथे एक करोनाग्रस्त रुग्ण आला होता. त्याच्यामुळे आपल्याला लागण झाल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केले. मात्र दाव्यामध्ये तो सांगत असणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये पोलिसांना विरोधाभास दिसून आला. त्यामुळेच त्यांनी या रुग्णाची कसून चौकशी केली असता त्याने आपला दावा सिद्ध करण्यासाठी दिलेली कागदपत्रे आणि तो सुपरमार्केटमध्ये उपस्थित होता हे सांगणारे पुरावे खोटे असल्याचे सिद्ध झालं.
या व्यक्तीचा खोटेपणा सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली. खोटी माहिती पसरवल्याबद्दल या व्यक्तीला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेनंतर या व्यक्तीला पुढील सहा महिने प्रोबेशन ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. अशाप्रकारे स्वत:च्या स्वार्थासाठी इतरांचे आयुष्य पणाला लावणाच्या अनेक बातम्या मागील काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. केरळमध्येही अशाप्रकारे इटलीवरुन आल्याची माहिती लवपून ठेवणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना सक्तीने पकडून विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.