Corporate Cobra Video : कॉर्पोरेटच्या दुनयेत लोक ठराविक काळाने नोकरी बदलून पगारवाढ मिळवताना पाहायला मिळतात, ही अगदी सामान्य बाब आहे. पण नुकतेच एका कर्मचाऱ्याने हा प्रकार एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंस्टाग्रामवर कॉमेडियन अनमोल गर्ग याने एका व्हिडीओच्या माध्यमातून एका कर्मचाऱ्याबद्दल माहिती दिली आहे, या व्हिडीओमध्ये तो सांगतो की एका व्यक्तीने वार्षिक चार लाखांच्या पगारावरून थेट १२ लाख रुपयांचे पॅकेज मिळवले आणि तेही फक्त एकदाच नोकरी बदलून.
कॉमेडियन अनमोल याला त्याच्या इन्स्टाग्रामवर एक डायरेक्ट मेसेज आला होता, ज्यामध्ये तो पाठवणाऱ्याने आपण कशा प्रकारे सॅलरी स्लिपमध्ये बदल करून, कोणतीही नवी कौशल्ये न शिकता किंवा नोकरीत बदल न करता जास्त पगार मिळवला याबद्दल माहिती दिली होती.
नेमकं त्याने काय केलं?
त्या व्यक्तीने सांगितलं की त्याने पेस्लिप एडिट केली, ज्यामध्ये असलेला मूळचा वार्षिक ४ लाखांचा पगार बदलून त्याने त्याजागी ७ लाख दाखवला. त्यानंतर ही एडिट केलेली सॅलरी स्लिप दाखवून त्याने नवीन कंपनीकडे पगारवाढ मागितली आणि त्याला ८.५ लाखांचे ऑफर लेटर मिळाले देखील. पण तो इथेच थांबला नाही, यानंतर तो दुसऱ्या एका कंपनीच्या मुलाखतीला गेला आणि तेथे त्याने पहिल्या कंपनीने दिलेले ८.५ लाख पगाराचे ऑफर लेटर दाखवले, ज्याच्या आधारावर त्याने अखेर १२ लाख वार्षिक पगाराची नोकरी मिळवली.
कॉर्पोरेट कोब्रा
दरम्यान हा मेसेज पाहून कॉमेडियन अनमोल याने त्या व्यक्तीचे धाडस आणि हुशारी पाहून थक्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा मेसेज वाचून झाल्यानंत तो की तू कॉर्पोरेट साप नाहीस तर तू कॉर्पोरेट कोब्रा आहेस. तसेच कोणतेही नवीन कौशल्य न शिकता किवा कामाचे स्वरूप न बदलता तो वर्षाला ४ लाखांच्या पगारावरून १२ लाखांवर पोहचल्याबद्दल तो आश्चर्य देखील व्यक्त करतो. “भाई तू साप नाहीस, तू कॉर्पोरेटचा कोब्रा आहेस. तू कोनतेही नवीन स्किल न शिकता, तेच काम करत असताना ४ वरून थेट १२ वर पोहचलास. एक दिवस तू मॅनेजर नक्की बनशील, तुझ्यामध्ये तो गुण आहे,” अशी प्रतिक्रिया अनमोलने दिली.
इतकेच नाही तर अनमोलने असा प्रकार करण्यामागील धोका देखील सांगितला आहे. तो म्हणतो की बहुतेक लोक बढती मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतात, तर हा व्यक्ती फोटोशॉपचा वापर करून पगार वाढवून घेत आहे. तसेच त्याने या व्हिडीओला परमेश्वर सर्वकाही पाहात आहे, असे मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे.
दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून याला १३ मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर कमेंट सेक्शनमध्ये लोक अनेक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.