Couple sell their baby for fifty thousand: पोटच्या लेकराला विकण्याचा निर्णय कोणतेही पालक कसं काय घेऊ शकतात… अशी नेमकी काय गोष्ट असेल की हा निर्णय एखाद्या जोडप्याला घ्यावा लागला असेल हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. ही घटना घडली आहे झारखंडमध्ये. अवघ्या एक महिन्याच्या बाळाला त्याच्या पालकांनी केवळ आर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून विकलं. हे ऐकल्यावर खरं तर कोणाचाही प्रचंड संताप होईल. मात्र, या जोडप्याने असे का केले आणि त्यानंतर पोलिसांनी याबाबत नेमका कसा हस्तक्षेप केला याची सविस्तर माहिती समोर आली आहे.
पलामू जिल्ह्यातील लेस्लिगांग भागात राहणाऱ्या एका जोडप्याने बिकट परिस्थितीमुळे पैशांसाठी म्हणून त्यांच्या पोटच्या मुलाला विकल्याचा आरोप आहे अशी माहिती झारखंड पोलीस अधिकारी सुनील कुमार सिंह यांनी दिली. अधिकाऱ्यांना ही बाब कळताच या प्रकरणात पलामू जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करत या बाळाला वाचवले. जिल्हा प्रशासनाने लोटवा गावात २० किलो धान्याचे वाटप केले. तसंच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांमध्ये नोंदणीदेखील करायला सुरूवात केली.
संबंधित जोडपे लोटवा इथे मजूर म्हणून काम करत होते. तसंच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नव्हते. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जिल्हा आयुक्तांना याच प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसंच सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश दिले.
मुलाला विकण्याचं नेमकं कारण काय?
वडील रामचंद्र राम यांनी पीटीआयला सांगितले की, त्यांच्याकडे मुलाला खायला देण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून त्यांनी शेजारच्या गावातील एका दलाल जोडप्याकडे मुलाला विकले. तसंच त्याची पत्नी प्रसूती झाल्यापासून आजारी होती आणि तिच्यावरही त्याला योग्य उपचार करता आले नाही. तिच्या उपचारासाठी आणि जेवणासाठी पैसे नसल्याने मुलाला विकण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. महत्त्वाचं म्हणजे या जोडप्याला आणखी चार मुलं आहे. हातावर पोट असल्याने कुटुंबाला सांभाळू न शकल्याने असे केल्याचे त्याने सांगितले.