रात्रीच्या वेळी गाडी चालवताना चालकाला जाणवणारी एक समस्या म्हणजे समोरून येणा-या गाड्यांच्या हेडलाईटचा प्रकाश. आजूबाजूला काळोख असतो त्यामुळे या अप्परचा प्रकाश अगदी डोळ्यांवर बसतो. अनेकदा या प्रकाशामुळे समोरचे दिसेनासे होते. पण आपल्याकडे चालकांना याची चांगलीच सवय झाली आहे. अनेकदा रस्ते आणि महामार्ग विकास मंडळाकडून याचा वापर कधी केला जावा याबद्दल सांगण्यात येते पण आपण या सूचनांकडे सर्रास दुर्लक्ष करतो. पण रात्रीच्या वेळी गाडी चालवताना डोळे दिपवणा-या लाईटचा वापर करून त्रास देणा-यांसाठी चीन लोकांनी भयावह स्टिकर्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा : Viral Video: सोशल मीडियावर तरुणीच्या भूताने घातले थैमान

भयावह मानवी चेहरे असलेले हे स्टिकर्स गाडीच्या मागे लावण्यात येतात. विशेष म्हणजे अंधा-या रात्री मागून येणा-या चालकाने अप्पर लाइट्स चालू ठेवल्या तर त्याच्या प्रकाशाने मागे लावण्यात येणारे स्टिकर्स चमकतात आणि गाडीत एखादे भूत बसले असल्याचा भास होतो. या भितीपोटी तरी कोणी अंधा-या रात्री अपर लाईट्स चालून ठेवून चालकाला त्रास देणार नाही अशी युक्ती या स्टिकर्स लावण्यामागे आहे. चीनच्या बाजारात २०० ते १००० रुपयांपर्यंत हे स्टिकर्स उलब्ध आहेत.

पण या स्टिकर्समुळे आतापर्यंत अनेकांचा जीव देखील गेला आहे किंवा अपघात तरी झाले आहे. कारण ज्यांना अशा स्टिकर्सबद्दल कल्पना नाही त्यांना अचानक गाडीच्या काचेतून रात्रीच्या वेळी दिसणारे भयावह चेहरे पाहून धक्का बसतो आणि यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावर अपघातही घडले आहे. त्यामुळे गाडीवर असे स्टिकर्स लावणा-यावर चिनच्या वाहतूक विभागाने कारवाई करायला सुरूवात केली आहे. असे स्टिकर्स लावणा-यांकडून पोलिसांकडून दुप्पट दंड वसूल करण्यात येतो.