पाकिस्तानमधील एका वाढदिवस पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. या वाढदिवसाच्या पार्टीत चक्क सिंहाला आणलं होतं. हे केवळ प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आणल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. Project Save Animals ने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटीझन्सने टीकेचा भडीमार सुरु केला आहे. या व्हिडिओत सिंहाच्या गळ्यात साखळी बांधली आहे. त्याचबरोबर त्याला गुंगीचं औषध दिल्याचं दिसत असून तो सोफ्यावर झोपल्याचं दिसत आहे. एखाद्या पाळीव कुत्र्यासारखं त्याला वागवण्यात येत आहे. पार्टीतील लोकंही त्याला वारंवार स्पर्श करून त्रास देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ लाहोरमधील असल्याचं बोललं जात आहे.

प्राणीमित्र संघटना Project Save Animals ने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच सिंहासोबत असं कृत्य करणाऱ्यांना कठोर शब्दात सुनावलं आहे. “एकीकडे सिंह आहे आणि दुसरीकडे लोकं जात आहेत. असं वाटतंय हा सिंह फक्त डेकोरेशनसाठी ठेवला आहे. त्या सिंहाला पण जीवन आहे. तोही श्वास घेतो, जगतो, आपल्यासारख्या त्यालाही जाणीवा आहेत.”, असं कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. हा व्हिडिओ सुसान खान नावाच्या महिलेचा असल्याचं बोललं जात आहे. या पार्टीत कर्णकर्कश आवाजात स्पीकर लावण्यात आल्याचं ऐकू येत आहे. त्यात प्राण्यांची ऐकण्याची क्षमता आपल्यापेक्षा २५ टक्के जास्त असते. अशा वेळी त्याच्यावर काय परिणाम होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी, हा एकप्रकारे सिंहावर केलेला अत्याचार आहे.

पाकिस्तानात जंगली प्राणी पाळण्यासाठी परवाना दिले जातात. त्यानंतर जंगली प्राण्याचा असा सर्रास वापर होताना दिसत आहे. या प्राण्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांना खोट्या प्रतिष्ठेसाठी मिरवलं जातं. यापूर्वीही पाकिस्तानातून असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटीझन्सच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याची दिसत आहे. यांच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. मात्र पाकिस्तानात अशा गोष्टींना सर्रास मान्यता असल्याने राग व्यक्त करण्यापलीकडे काहीही करता येणार नाही.