तौते चक्रीवादळानं मुंबईला सोमवारी जोरदार तडाखा दिला. सोसाट्याचा वारा आणि समुद्राला आलेलं उधाण यामुळे मुंबईत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मुंबईत अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, तर झाडांची पडझड झाल्याच्याही अनेक घटना घडल्या. दरम्यान विक्रोळीत एक महिला थोडक्यात बचावली असून ह्रदयाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

विक्रोळीमध्ये पोलीस ठाण्यासमोर एक झाड कोसळलं. यावेळी एक महिला तिथेच रस्त्यावरुन जात होती. झाड पडत असल्याचं लक्षात येताच महिलेने धाव घेतली आणि थोडक्यात बचावली. महिलेपासून काहीशा अंतरावर हे झाड कोसळलं. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिलेने प्रसंगावधान दाखवलं नसतं तर कदाचित झाडाखाली येऊन तिचा मृत्यू झाला होता.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण कमेंट करत आहेत.

तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सहा जणांचा तर गुजरातमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.