Delhi Srinagar IndiGo Flight Turbulence Viral Video : दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानावर बुधवारी रात्री वीज कोसळली. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. वादळी वारा अन् मुसळधार पाऊस सुरू असतानाच ही घटना घडली, ज्यामुळे विमानाचे श्रीनगर विमानतळावर इमर्जन्सी लाँडिंग करण्यात आले. वैमानिकाने वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे विमानातील क्रू मेंबर्ससह २२७ प्रवाशांचे जीव वाचू शकले. याच घटनेचा एक लाइव्ह थरारक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, खराब हवामानात अचानक विमानाला अचानक जोरदार धक्के बसत असल्याचे जाणवू लागले आणि त्यामुळे प्रवाशांमध्येही भीती व अस्वस्थता निर्माण झाली, तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, अनेक प्रवासी विमानात भीतीने ओरडू लागले. लहान मुलांना काय घडतेय हे न समजल्याने तेही गोंधळून जोरदार रडू लागले. एकूणच विमानात गोंधळ निर्माण झाला. विजेमुळे विमान हादरले आणि त्यामुळे विमानातील प्रवाशांसह जवळपास सर्वांनाच आपल्याला आता मृत्यूला कवटाळण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा भीतीने ग्रासले. घाबरलेले प्रवासी जीव वाचविण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करू लागले. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज आला असेल काय भीषण परिस्थिती असेल तेव्हा.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. खराब हवामानामुळे वैमानिकाने श्रीनगरमधील एअर ट्रॅफिक कंट्रोलला त्याबाबत माहिती दिली, त्यानंतर विमान संध्याकाळी ६.३० वाजता सुरक्षितपणे इमर्जन्सी लँड करण्यात आले.