Viral Video: प्रवासादरम्यान अनेकदा वाहनचालकांमध्ये भांडणे होतात. कित्येकदा अशा भांडणांत कोणी मध्यस्थी न करणेच योग्य ठरते. कारण- कधी कधी हे भांडण हाणामारीपर्यंत टोकाला जाऊन पोहोचते. आज असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक्स (ट्विटर) युजर दीपक जैन यांच्याबरोबर एक थरारक घटना घडली आहे. एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या कारची उजवीकडील खिडकी फोडली आणि त्यांना गाडीतून उतरण्यास उघडण्यास भाग पाडले आहे. नेमके काय घडले ते सविस्तर जाणून घेऊ.
व्हायरल व्हिडीओ बंगळुरूचा आहे. एक अज्ञात इलेक्ट्रिक स्कूटरचालक, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका चारचाकी गाडीचालकाचा बऱ्याच वेळापासून पाठलाग करीत होता. चारचाकी गाडीचालकास थांबविण्यासाठी त्याला तो मागून हाक देत ओरडत होता; पण तो चारचाकी गाडीचालक न थांबल्याने दुचाकीस्वाराने चारचाकी गाडीच्या पुढ्यात आपली इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्यात उभी केली. मग रस्त्याच्या कडेला पडलेला नारळाचा शेंडा उचलून , चारचाकी चालकाच्या गाडीची काच फोडण्यास सुरुवात केली. नक्की काय घडले ते एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नारळाने खिडकी फोडल्यानंतर अज्ञात व्यक्ती रीअर व्ह्यू मिररसुद्धा तोडण्यास सुरुवात करते. नारळाचा शेंडा उचलून अनेकदा खिडकीवर आघात केल्यानंतर अज्ञात व्यक्ती नारळाचा शेंडा कारच्या मागील काचेवर फेकून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यानंतर काही वेळाने चारचाकी चालविणारी व्यक्ती स्वतःचा बचाव करून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. तितक्यात एक दुसरी कार त्याचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या गाडीचालकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे ते त्याच टोळीचे सदस्य असावेत, असे ज्याच्या गाडीवर हल्ला झाला, त्या चारचाकी चालकाचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @DJain1989 चारचाकी गाडीचालकाच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या घटनेने युजरला हादरवून टाकले आहे व ही पोस्ट शेअर करताना त्यांना या घटनेदरम्यान कसा अनुभव आला हे त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. चारचाकी चालकाने गाडीत डॅशकॅम बसवून घेतला होता आणि त्यामुळे संपूर्ण घटना त्यात रेकॉर्ड झाली. डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ आणि घडलेल्या घटनेचे सर्व प्रकारचे पुरावे म्हणून चालकाने लोकेशन, स्क्रीनशॉट, गाडीची खिडकी व आरसा फोडल्याचे सर्व स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तसेच दुचाकीस्वाराचा फोटो आणि त्याची सविस्तर माहितीसुद्धा पोस्टमध्ये सांगितली आहे; जेणेकरून संबंधित दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल.