Young Girl Spend First Salary To Fulfill Father’s Dream: पहिला पगार नेहमीच आकड्यांपेक्षा खूप मोठा असतो, त्यात भावना असतात. तुम्ही कोणत्याही ‘तुम्ही तुमचा पहिला पगार कसा खर्च केला” यावर प्रत्येकजण तुम्हाला काहीतरी खासच सांगेल. दरम्यान रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तरुणीने १८ महिन्यांचा संघर्ष, करिअर ब्रेक आणि अखेर १८ महिन्यांनंतर नोकरी मिळाल्यानंतर तिच्या पहिल्या पगाराद्वारे वडिलांचे ३० वर्षांचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले आहे.
मुंबईतील एका आलिशान हॉटेलजवळून जात असताना, या तरुणीच्या वडिलांनी तिला एक जुनी आठवण सांगितली होती. अनेक दशकांपूर्वी ते त्याच हॉटेलच्या बाहेर उभे राहिले होते आणि एक फोटो काढला होता. त्यांचे स्वप्न होते की, एक दिवस पत्नीला घेऊन या हॉटेलमध्ये यायचे.
या तरुणीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तो जुना फोटो आजही माझा सर्वात आवडता फोटो आहे. माझी आई मी किशोरवयातच गेली आणि त्यांचे ते स्वप्न कायमच आमच्यासोबत राहिले.”
बचतीला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढणारी आणि शिक्षणासाठी वेगळ्या शहरात राहणारी, एखादी व्यक्ती नियोजन करत नसली तरीही बचत करायला आपोआप शिकते. म्हणून करिअरमधील ब्रेकनंतर पहिल्यांदाच पगार मिळाल्यानंतर स्वाभाविकच बचत आणि भविष्यासाठी नियोजन कराण्यास भाग पडते. शेवटी, सुरक्षिततेला नेहमीच कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते.
जेव्हा या तरुणीचा पहिला पगार तिच्या बँक खात्यात जमा झाला, तेव्हा स्वतःवर पैसे खर्च करण्याऐवजी, तिने तिच्या वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. तिने त्याच हॉटेलमध्ये राहण्यासाठी एक खोली बुक केली. तरुणीच्या या कृतीमुळे वडिलांना असा अनुभव मिळाला ज्याती त्यांनी अनेक दशकांपूर्वी कल्पना केला होती, पण त्यांना कधीही या हॉटेलमध्ये येता आले नव्हते.
तरुणीने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “त्यांना (वडिलांना) त्या हॉटेलच्या भव्य हॉलमधून चालताना, सगळे अनुभवताना, लहान मुलासारखे हसताना पाहणे खूप अमूल्य होते.”
दरम्यान या तरुणीचा आणि तिच्या वडिलांचा हा क्षण खास बनवण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यांनीही खूप मेहनत घेतली. त्यांनी खोली फुलांनी सजवली, काही वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी काढलेला तिच्या दिवंगत आईचा फ्रेम केलेला फोटो आणि केकची व्यवस्था केली.
\ज्या वयात लोक पहिला पगार मिळाल्यानंतर तो गॅझेट्स किंवा लाईफस्टाईलवर खर्च करतात, त्या वयात या तरुणीची निवड वेगळी होती. ती म्हणते की “मी आतापर्यंत केलेल्या खर्च केलेल्या पैशांपैकी हा सर्वोत्तम खर्च आहे.” आणि तरुणीचे म्हणणे खरेच आहे. तिच्या वडिलांना आयुष्यात एकदाच मिळणारा अनुभव देण्याच्या आनंदाची बरोबरी कोणतेही डिव्हाइस किंवा कार करू शकत नाही.
दरम्यान या तरुणीच्या पोस्टने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी या तरुणीच्या कृतीचे तोंडभरून कौतुक केले आहे.