दिल्लीत एक धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. शासकीय शाळेतील एका शिक्षिकेनं इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर कैचीने हल्ला केला. त्यानंतर तिला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. वंदना असं या विद्यार्थीनीचं नाव असून तिच्यावर बारा हिंदूराव रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना दिल्ली नगर निगम बालिका विद्यालयात सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगानं फिरवत शिक्षिकेला अटक केली. गीता देशवाल असं अटक केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, शिक्षिका गीता वंदनाला मारहाण करत असल्याचं रिया नावाच्या दुसऱ्या शिक्षिकेनं पाहिलं. त्यानंतर रियाने वंदनाला गीताला समजवण्याचा प्रयत्न केला. वंदनाला मारहाण करु नको, असंही तीने गीताला सांगितलं. परंतु, गीताने रागाच्या भरात वंदनावर कैचीने हल्ला करत तिला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकलं. वंदना खाली पडल्यानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी या घटनेबाबत तातडीनं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वंदनाला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आणि आरोपी गीताला अटक केली.

नक्की वाचा – Fifa World Cup 2022: ‘अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स’ अंतिम सामन्याआधी SBI च्या पासबुकचा फोटो होतोय Viral, कारण वाचून धक्काच बसेल

वंदनाची प्रकृती स्थीर असून याप्रकरणी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे, शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती दिल्ली महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आयपीसीच्या सेक्शन ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (सेंट्रल) श्वेता चव्हाण यांनी दिली.