खासगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारासह इतर आणखी काही सुविधा कंपनीकडून दिल्या जातात. या सुविधांमध्ये सुट्ट्यांचाही समावेश असतो. एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामाच्या वेळी रजा न मिळणं सामान्य बाब आहे. मात्र, तो आजारी पडल्यानंतर त्याला काहीही करुन रजा घ्यावीच लागते आणि कंपनीला ही ती द्यावी लागते. पण सध्या एका कर्मचाऱ्याने आजारपणाच्या सुट्ट्या घेतल्या म्हणून त्याला कंपनीने कामावरुन काढून टाकल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. शिवाय कंपनीला असं करणं खूप महागातदेखील पडलं आहे. तर हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, मिहालिस बुइनेंको नावाच्या व्यक्तीने आयर्लंडमधील लिडल कंपनीच्या मुख्य कार्यालयात सुमारे ११ वर्षे काम केले. पण २०२१ मध्ये त्याने जवळपास ६९ रजा घेतल्या म्हणून त्याला कंपनीतील वरिष्ठांनी कामावरून काढून टाकलं. मात्र, कर्मचाऱ्याने ६९ रजा एकाच वेळी घेतल्या नव्हत्या तर त्याने त्या रजा १६ महिन्यांच्या कालावधीत घेतल्या होत्या. कर्मचारी त्याला कंपनीने कामावरुन काढल्याचे प्रकरण वर्कप्लेस रिलेशन कमिशनकडे घेऊन गेला आणि डब्ल्यूआरसीन मिहालिसच्या बाजूनेच निर्णय दिला इतकंच नव्हे तर या कंपनीला कर्मचाऱ्याला जवळपास १४ हजार युरो भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र, कंपनीने हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितलं.

हेही पाहा- ‘कितना कर्जा है…’ प्रेयसीच्या फोन रिचार्जमुळे कर्जबाजारी झालेल्या प्रियकराने गाण्यातून मांडली व्यथा; Video झाला व्हायरल

कंपनीने काय सांगितलं?

या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान कंपनीने आपल्या माजी कर्मचाऱ्यावर आरोप केला की, त्याने ६९ वेळा सुट्ट्या घेतल्या आणि १० वेळा तो कंपनीतून लवकर निघून गेला. त्यामुळे कर्मचाऱ्याने कंपनीचे काही नियम मोडले असल्याचं कंपनीने WRC ला सांगितलं. शिवाय त्याने रजा घेण्याचे आणि कंपनीतून लवकर निघून जाण्याचे कोणतेही वैध कारण दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांला नोकरीवरून काढून टाकलं असंही कंपनीने सांगितलं.

कर्मचारी म्हणाला..

मिहालिसने WRC समोर सांगितलं की, मी घेतलेली प्रत्येक सुट्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली होती. मी आजारी असल्यामुळे ऑफिसला जाऊ शकत नव्हतो. शिवाय आपल्या कंपनीच्या नियमावलीमध्ये आजारी असल्याच्या कारणामुळे जास्त सुट्या घेतल्या तर कोणती कारवाई करण्यात येईल किंवा कामावरुन काढलं जाईल, असं सांगितलं नव्हत असंही मिहालिस म्हणाला.

कोर्टाने कर्मचाऱ्याच्या बाजूने दिला निकाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिडल कंपनीने कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याने डब्ल्यूआरसीला सांगितले की, त्याला कामावरुन काढून टाकल्यामुळे खूप त्रास झाला आहे. यानंतर, जेव्हा WRC ने कंपनीचे धोरण वाचले तेव्हा त्यात आजारपणामुळे घेतलेल्या रजेशी संबंधित कोणताही नियम नसल्याचे आढळून आले. त्यामुळे डब्ल्यूआरसीने कंपनीला मिहालिसला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने कंपनीला १४ हजार युरो म्हणजेच १२ लाख ३३ हजार ४०० रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंपनीला मनमानी कारभार करणं चांगलेचं महागात पडल्याची चर्चा सध्या सुरु आहे.