Sindoor And mangalsutra Viral Video Of Divija Bhasin: काही दिवसांपूर्वी, कंटेंट क्रिएटर आणि थेरपिस्ट दिविजा भसीन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्यांनी, “हा व्हिडिओ वादग्रस्त वाटेल, पण तो वादग्रस्त नाही”, असे म्हटले होते.

यामध्ये दिविजा यांनी कुंकू का लावत नाहीत आणि मंगळसूत्र का घालत नाही, याबाबत स्पष्टीकरण दिले होते. याचबरोबर, लग्नानंतर त्यांनी काही गोष्टी बदलल्या नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्या म्हणाल्या, “मी माझ्या पतीचे आडनाव लावत नाही. मी कुंकूही लावत नाही आणि मंगळसूत्रदेखील घालत नाही. माझा पती कुंकू लावत नाही किंवा मंगळसूत्र घालत नाही, मग मी का घालावे? आम्ही दोघेही ब्रेसलेट घालतो.”

मला जे हवे ते करते

पुढे दिविजा यांनी सांगितले की, लग्नानंतर त्यांनी त्यांच्यात कोणताही बदल केलेला नाही. “लग्नानंतरही मी आधी जशी होती तशीच आहे. मला जे हवे ते मी घालते, मला जे हवे ते मी करते. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे.”

या व्हिडिओमध्ये दिविजा आणि त्यांच्या पतीने त्यांच्यासाठी योग्य जीवनशैली आखल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “आम्ही लग्नानंतर भाड्याने घर घेतले. आम्ही दोघेही आमच्या पालकांवर प्रेम करतो, तरी ते आमच्यासोबत राहत नाहीत. आमच्याकडे एक स्वयंपाकी आहे कारण आम्ही दोघेही कमावतो आणि ते आम्हाला परवडते. जर स्वयंपाकी नसता, तर आम्ही दोघेही एकत्र स्वयंपाक करायला शिकलो असतो.”

“या गोष्टींवर विश्वास नसलेल्या पुरुषाशी मी लग्न केले नसते. लग्नानंतर माझ्या आयुष्यात एकच गोष्ट बदलली आहे, आता मला माझ्या पतीसोबत दररोज रात्री एकत्र राहता येते”, असे त्यांनी पुढे सांगितले.

तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील…

व्हिडिओच्या शेवटी दिविजा म्हणाल्या की, “मी तुम्हाला हे सर्व का सांगत आहे? कारण लग्न हा इतका भयानक, नकारात्मक अनुभव नसतो जिथे स्त्रीला सर्व गोष्टी बदलाव्या लागतात आणि पुरुषाला फक्त त्याच्या कुटुंबासोबत राहण्याची, करिअर करण्याची आणि त्याला हवे ते करण्याची संधी मिळते. लग्न समान असू शकते. आपला समाजच त्याला असमान बनवतो. समाज इतर लोकांपासून बनलेला नाही, त्यात माझा देखील समावेश आहे. आणि जर मला नियम बदलायचे असतील, तर मी बदलेन. म्हणून, जर तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील, तर त्या करू नका.”

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहींनी दिविजा यांच्या नवीन दृष्टिकोनाचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या निवडींवर टीका केली.

एका युजरने लिहिले की, “हे वादग्रस्त नाही. हे समाधान देणारे आहे.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “कुंकू आणि मंगळसूत्र हे अत्याचाराचे लक्षण नाही. ते दैवी आहे. ती आपली संस्कृती आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा अर्थ असा नाही की त्यांनी त्यांची संस्कृती विसरावी.”