मुंबईच्या महालक्ष्मी येथील समुद्रात डॉल्फिन्स दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुंबईचा परिसर दिसत असल्याने संभ्रमही निर्माण झाला आहे. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने या व्हिडिओची सतत्या पडताळून पाहण्यासाठी प्राणीप्रेमी आणि वन विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र, त्यांनी मुंबई नजीकच्या समुद्रात जिवंत डॉल्फिन्स आढळण्याची शक्यता फेटाळून लावली.

मुंबईचे वनविभाग अधिकारी प्रशांत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुंबईत डॉल्फिन आढळण्याची शक्यता खूपच कमी आहे. मुंबईतील खाऱ्या पाण्यात डॉल्फिन आढळणं जवळपास अशक्यच आहे, कारण भारतात गोड्या पाण्यातले डॉल्फिन आढळतात. मुंबई नजीकच्या समुद्रात आतापर्यंत जे डॉल्फिन आढळले आहेत ते मृतावस्थेत होते, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई नजीकच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आणि कुजलेल्या डॉल्फिनचे शव वाहून आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, परंतु जिवंत डॉल्फिन दिसण्याची घटना अशक्य आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मुंबईतला नसावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरात मुंबई नजीकच्या समुद्रात डॉल्फिन्स आढळल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

तर दुसरीकडे प्राणीप्रेमी नीलेश भणगे यांनीदेखील या व्हिडिओबाबत शंका उपस्थित केल्या. गोड्या पाण्यात डॉल्फिन आढळतात किंवा नदी आणि समुद्रचा संगम जिथे होतो अशा ठिकाणी डॉल्फिन्स क्वचित दिसतात. मात्र, मुंबईत डॉल्फिन्स आढळणं दुर्मिळ गोष्ट असल्याचं भणगे यांनी सांगितले.