पेप्सी कंपनीचे कोणतेही शीतपेय पुढील काही दिवस पिऊ नका, असे आवाहन हैदराबाद पोलिसांनी केले आहे. पेप्सीकोच्या सर्व शीतपेयांत इबोलाचे विषाणू मिसळण्यात आले आहेत. कंपनीतील एका इबोलाग्रस्त कर्मचाऱ्याने आपले विषाणूग्रस्त रक्त शीतपेयांत मिसळले आहे, अशी एक बातमी सध्या समाजमाध्यमांतून प्रसारित होत आहे. तशी ही बातमी दर काही महिन्यांनी व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर धुमाकूळ घालताना दिसतेच! मात्र यात काहीही तथ्य नसल्याचे पेप्सीकोने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ‘हा एक जुनाच खेळ’ असल्याचे पेप्सीकोने म्हटले आहे.

शीतपेयेचे नव्हे, तर अन्यही अनेक खाद्यपदार्थात विषाणू मिसळण्यात आल्याचे संदेश अनेकदा व्हायरल झालेले दिसतात. कधी इबोला तर कधी एचआयव्हीच्या विषाणूंचे वृत्त पसरवले जाते. मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचे संदेश २००४ पासून विविध खाद्यपदार्थाच्या नावांनी प्रसारित केले जात आहेत.