टेस्लाचे सह-संस्थापक इलॉन मस्क यांची पूर्व प्रेयसी जेनिफर ग्वेन (Jennifer Gwynne) हिने कॉलेजच्या दिवसांपासूनचे काही जुने फोटो लिलावासाठी ठेवले आहेत. इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, जेनिफर आणि मस्क हे १९९४-९५ च्या आसपास पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात एकत्र शिकत होते. दोघंही विशीत असताना जवळपास वर्षभर ते रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हाचे काही दूर्मिळ फोटो जेनिफरने लिलावासाठी ठेवले आहेत. जेनिफरचं वय सध्या ४८ वर्षे असून तिने आपल्या सावत्र मुलाच्या शिक्षणासाठी निधी गोळा करण्यासाठी, हे फोटो लिलावासाठी ठेवले आहेत.

जेनिफरने लिलावासाठी एकूण १८ फोटो ठेवले आहेत. ज्यामध्ये इलॉन मस्क तिच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. संबंधित फोटोंमध्ये इलॉन मस्क आपल्या मित्रांसोबत मजा करताना, कॉम्प्युटरवर काम करताना आणि त्याच्या खोलीत आराम करताना दिसत आहे. संबंधित फोटो ‘आरआर ऑक्शन्स’ या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. यातील बहुतेक फोटोंची पायाभूत किंमत १०० डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा- गुगलच्या सह-संस्थापकाच्या पत्नीसोबतच्या कथित प्रेमप्रकरणावर इलॉन मस्क यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “काल रात्रीच आम्ही…”

मस्कसोबतचे संबंध प्रेमळ होते, पण अत्यंत जिव्हाळ्याचे नव्हते, असं जेनिफरने म्हटलं आहे. १९९५ साली इलॉन मस्क पुढील शिक्षणासाठी पालो अल्टो येथे गेल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. पालो अल्टो येथे गेल्यानंतर इलॉन मस्कची जस्टीन विल्सनसोबत मैत्री झाली. त्यानंतर पुढे दोघांनी लग्न केलं. जस्टीन विल्सन ही इलॉन मस्कची पहिली पत्नी आहे.

हेही वाचा- विश्लेषण : इलॉन मस्क – सर्जी ब्रिन यांच्या दुराव्याला कारणीभूत ठरलेली निकोल शानाहन आहे तरी कोण?

जेनिफरने आपल्या रिलेशनशिपबाबत सांगितलं की, “ती १९९४ साली पहिल्यांदा इलॉन मस्कला भेटली. त्यावेळी मस्क हा विद्यापीठात जेनिफरचा सिनिअर होता. दरम्यान, दोघंही एकाच वसतिगृहात राहत होते. दोघांनी एकत्र कामही केलं आहे. महाविद्यालयीन जीवनात मस्क हा खूपच हूशार होता. तो सतत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचा. तो नेहमी इलेक्ट्रिक कारबद्दल खूप बोलायचा, असंही जेनिफरने सांगितलं.