X Post Of Employee Leaving Company On First Day Of Job: दिल्लीतील एका स्टार्टअप कंपनीतील कर्मचाऱ्याने पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याबद्दलच्या व्हायरल ट्विटमुळे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा रंगली आहे. या व्यक्तीला दिल्लीतील एका स्टार्टअप कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. पण तो नोकरीच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत अचानक ऑफिसमधून निघून गेला. यावेळी जाताना त्याने त्याला दिलेला लॅपटॉप ऑफिसमध्येच ठेवला होता. अचानक निघून गेल्यानंतर कंपनीतून त्याला फोन येऊ लागले. यानंतर शेवटी त्याने एचआर प्रतिनिधीला फोन केला आणि त्याच्याकडे स्पष्ट केले की, तो या कंपनीत काम करू शकणार नाही.

काय आहे प्रकरण?

या सर्व प्रकरणाबाबत एका एक्स युजरने पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये या युजरने म्हटले आहे की, “एका मित्राने मला दिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये घडलेल्या प्रकरणाबाबत माहिती दिली. कंपनीतील नोकरीच्या पहिल्याच दिवशी एक कर्मचारी, तो जेवणाच्या सुट्टी त्याचा लॅपटॉप त्याच्या डेस्कवर ठेवून निघून गेला आणि परत कामावर आलाच नाही. सुरुवातीला त्याने कंपनीतून येणाऱ्या सर्वांच्या फोनकडे दुर्लक्ष केले पण नंतर तो एचआर शी बोलला आणि सांगितले की, तो कंपनीत काम करू शकत नाही.”

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या प्रकरणामुळे कामाच्या ठिकाणची संस्कृती आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्याने अचानक पहिल्याच दिवशी नोकरी सोडण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, नेटिझन्सनी त्याच्या निर्णायकपणाचे कौतुक केले. काहींनी असा अंदाज लावला की, हा प्रकार कामाच्या विषारी वातावरणाचे किंवा अपेक्षांमधील विसंगती दर्शवते. इतर काही युजर्सनीही असेच अनुभव शेअर करत, मानसिक समाधान आणि कामाच्या ठिकाणच्या सकारात्मक वातावरणाला प्राधान्य देण्याच्या वाढत्या ट्रेंडवर प्रकाश टाकला.

प्रामाणिकपणे सांगायचे तर…

एका युजरने लिहिले की, “हे विचित्र आहे, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर आश्चर्यकारक नाही. स्टार्टअप संस्कृती दडपण आणणारी असू शकते आणि कधीकधी ते योग्य नसते. आपले मन कधीच चुकीचे मार्गदर्शन करत नाही. ते जरी पहिल्याच दिवशी नोकरी सोडायला सांगत असेल, तरी त्याच्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का?”

मानसिक समाधान

दुसरा युजर म्हणाला, “प्रत्येकाने आपले मानसिक समाधान जपण्याचे धाडस केले पाहिजे.” तर आणखी एक युजर म्हणाला, “कणा ताठ ठेवल्याबद्दल मला त्याचा आदर वाटतो.”